मांढरगडावर ‘चांगभलं’चा गजर!
By admin | Published: January 6, 2015 02:02 AM2015-01-06T02:02:05+5:302015-01-06T02:02:05+5:30
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती.
मांढरदेव : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमला. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत कडाक्याची थंडी आणि दाट धुके असल्याने भाविकांना दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लावाव्या लागल्या.
शाकंभरी पौर्णिमेचा (पौष पौर्णिमा) दिवस असल्याने असंख्य भाविक गडावर दाखल झाले होते. पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. देवीच्या दारातील प्रथम भाविक पांडुरंग सखाराम खोपडे व त्यांच्या पत्नी रत्नाबाई यांना पूजेचा मान मिळाला. खोपडे हे मुळचे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील असून सध्या मुंबईला राहतात. सोमवारी दुपारी अनेक गावांचे देव्हारे व पालख्या मंदिर परिसरात आल्या. त्यामुळे काही काळ गर्दी झाली होती; परंतु पोलीस व स्वयंसेवकांनी उत्तम नियोजन केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)
देवीला गोड नैवेद्य
मांढरदेव येथे पशुहत्या करण्यास बंदी आहे. त्यामुळे लोक देवीला गोड नैवेद्य दाखवत होते.
सातारा जिल्ह्याच्या मांढरदेव गडावरील श्री काळुबाईच्या यात्रेनिमित्त सोमवारी राज्यासह आंध्र आणि कर्नाटकातील भाविकांची गर्दी उसळली होती.