भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्याची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2016 04:48 AM2016-08-04T04:48:42+5:302016-08-04T04:48:42+5:30

भष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदाराची तडकाफडकी सशस्त्र दलात उचलबांगडी करण्यात आली आहे.

Changing the speaker against corruption | भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्याची बदली

भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्याची बदली

Next


मुंबई : मुंबईतील वाहतूक शाखेतील अधिकाऱ्याकडून होणाऱ्या भष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदाराची तडकाफडकी सशस्त्र दलात उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रामाणिक पोलिसाच्या अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या गळचेपीबाबत खात्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अंमलदारांना वाहतूक शाखेत पाच वर्षांचा कालावधी असताना अडीच वर्षे पूर्ण झाली असताना त्यांची प्रशासकीय कारणे दाखवून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकांसह १० अंमलदारांच्या मंगळवारी प्रशासकीय कारणास्तव सशस्त्र पोलीस दल (एल-ए) बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांकडून आलेल्या गोपनीय अहवालानुसार संबंधितांच्या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र त्यामध्ये दिंडोशी वाहतूक शाखेतील हवालदार सुनील टोके यांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची लूटमार केली जात असल्याबाबत पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याबाबत काहीही कारवाई न झाल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांकडे पुरावे उघड केले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांच्या बदल्या करून चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानंतर सुनील टोके हे सातत्याने शाखेतील व चौकीतील वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या ‘आॅर्डली’कडून केल्या जाणाऱ्या गैरव्यवहाराबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागवून कारवाईची मागणी करीत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जावर आयुक्त पडसलगीकर यांच्या सूचनेनूसार दोन महिन्यांपूर्वी ‘क्राइम ब्रँच’कडून तपास करण्यात येत होता. मात्र संबंधितांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकरण दाबण्यात आले. त्यानंतर टोके यांना पुन्हा जबाबासाठीही बोलावण्यात आले नाही. त्यानंतरही टोके यांनी खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आयुक्त/ वाहतूक सहआयुक्त यांना अर्ज करीत होते. त्यामुळे अडचणीत येत असलेल्यांनी त्यांची अन्यत्र बदली करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
>आरटीआयचा वापर
हवालदार टोके हे आरटीआयचा वारंवार वापर करून अधिकाऱ्यांना अडचणीत आणत असल्याने प्रभारी अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालानुसार त्यांनी सशस्त्र दलात बदली करण्यात आल्याचे प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सुनील टोके यांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची लूटमार केली जात असल्याबाबत पुराव्यानिशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

Web Title: Changing the speaker against corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.