हृदयाला जीवापाड जपा

By admin | Published: November 10, 2014 01:01 AM2014-11-10T01:01:14+5:302014-11-10T01:01:14+5:30

मानवी आयुष्यात मेंदूसोबतच हृदयाचे स्थानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकवेळ योग्यवेळी मेंदूला काही आठवले नाही किंवा कुठला त्रास झाला तर जीवननौका तरून जाईल, मात्र जर हृदय काही

Chanting the Heart for Jivapad | हृदयाला जीवापाड जपा

हृदयाला जीवापाड जपा

Next

पंचविशीपर्यंतच्या युवकांनादेखील हृदयविकाराचा झटका
नागपूर : मानवी आयुष्यात मेंदूसोबतच हृदयाचे स्थानदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकवेळ योग्यवेळी मेंदूला काही आठवले नाही किंवा कुठला त्रास झाला तर जीवननौका तरून जाईल, मात्र जर हृदय काही क्षणांसाठी जरी बंद पडले तर तो आयुष्याचा शेवट ठरू शकतो.
अगदी काही मिनिटे अगोदर आपल्याशी हसून बोलणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराचा जोरदार झटका आल्यास क्षणात जीव जाऊ शकतो. आपल्या देशात सर्वाधिक नैसर्गिक मृत्यू हे हृदयविकारामुळेच होतात. त्याचप्रमाणे हृदयाशी संबंधित असलेले रोग हे केवळ वृद्धापकाळातच होतात असेही नाही. गेल्या काही वर्षांपासून तर तरुणांमध्येदेखील याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अगदी पंचवीशीपर्यंतच्या युवकांनादेखील हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणे दिसून येतात. याला आनुवंशिकता वगैरे कारणे असली तरी सवयी व जीवनमानदेखील याला तितकेच जबाबदार आहेत. आजच्या धकाधकीच्या युगात इकडून तिकडे धावपळ करताना शरीराकडे योग्य लक्ष द्यायला वेळच राहत नाही. मात्र आजचे हे दुर्लक्ष भविष्यात मोठी समस्या ठरू शकते हे निश्चित. त्यामुळे योग्य वेळी योग्य काळजी घेणे हाच यावरचा उत्तम उपाय आहे.
(प्रतिनिधी)
आहारावर नियंत्रण हवे - आपल्या आहारावर सुरुवातीपासूनच नियंत्रण हवे. आहारातही जर शिस्त जपली तर प्रकृतीला ते फार फायदेशीर ठरू शकते. आहारात जास्तीत जास्त ताज्या व कच्च्या भाज्या, फळे यांचे सेवन करावे. तेलकट, तूपकट, कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढेल असे पदार्थ जास्त खाणे तर टाळावेच. त्याचप्रमाणे मीठ, साखर, तिखट यांचा उपयोग देखील मर्यादित प्रमाणातच करावा . जंकफूड्स, अतिप्रमाणात मद्यसेवन हृदयासाठी घातक ठरू शकते.
नो स्मोकिंग- धूम्रपानावर नियंत्रण ठेवले तर मोठा त्रास वाचू शकतो. विशेष म्हणजे अतिधूम्रपानामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका यामुळे वाढू शकतो.
व्यायाम हवाच - हृदयविकार होऊ नये याकरिता सर्वात उत्तम उपाय म्हणजे रोज सकाळी उठून व्यायामाची सवय. धावपळीच्या जीवनातदेखील व्यायामासाठी वेळ काढणे चांगले. सकाळच्या ताज्या व प्रसन्न हवेत चालल्याने शरीरालादेखील नवा उत्साह मिळतो. त्याचप्रमाणे प्राणायाम, योग हेदेखील हृदयविकार टाळण्यात मदत करतात. पोहण्यासारखा व्यायामदेखील शरीराला फायदेशीर ठरू शकतो
तणाव टाळा- मनावर कुठल्याही गोष्टीचा ताण येणे स्वाभाविक आहे . मात्र जर तणाव आला तर त्याच गोष्टीचा जास्त विचार करू नका. एखाद्या दुसऱ्या कामात किंवा चांगल्या गोष्टीत लक्ष घाला. जर तेही शक्य नसेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ तणाव मोकळा करा. जर एखाद्या वेळी फार तणाव वाटत असेल किंवा चिडचिड वाटत असेल तर दीर्घश्वास घ्या व आकडे मोजा. असे पाच ते दहा मिनिटे केल्यावर तुम्हाला ताण हलका झाल्यासारखे वाटेल. तसेच जर आजूबाजूला कुठले बाळ असेल तर त्याच्याशी खेळल्याने किंवा बोलल्याने तणाव कमी होण्यास नक्की मदत मिळेल.
नियमित तपासणी - जर तुम्हाला हृदयाचा त्रास असेल किंवा हृदयाजवळ दुखत असेल अथवा कुठला लहानसा त्रास वाटत असेल तरी डॉक्टरकडे जाण्याचे टाळू नका. हृदयाची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच पन्नाशी ओलांडल्यावर तर वर्षातून दोनदा तरी संपूर्ण तपासणी केली तर उत्तम.
योग्य झोप हवी - शरीराला आरामाची देखील नितांत गरज असते. सात तासांची झोप घेणे आवश्यकच आहे. जर झोप पूर्ण झाली नाही तर हृदयावर ताण येऊ शकतो.

Web Title: Chanting the Heart for Jivapad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.