मंडल कार्यालयाचा अनागोंदी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 01:27 AM2016-08-24T01:27:36+5:302016-08-24T01:27:36+5:30
यवत मंडल अधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे.
यवत : यवत मंडल अधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे. वारस नोंद, बँकाचा बोजा नोंदी व खरेदीच्या नोंदी होत नसल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून येथे कायमस्वरूपी मंडल अधिकारी नसल्याने कारभार अतिरिक्त भार तात्पुरत्या अधिकाऱ्यावर सोपविला जात आहे. यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर कायमस्वरूपी मंडल अधिकारी नेमावा, अशी मागणी केली जात आहे.
यवत मंडल अंतर्गत दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील यवत, खामगाव, नांदुर, कासुर्डी, बोरीऐंदी व भरतगाव ही गावकामगार तलाठी कार्यालये येतात. सदर तलाठी कार्यालयांतर्गत तालुक्यातील अनेक महसुली गावांचा कारभार चालतो. मागील आठ महिन्यांपासून या परिसरातील शेतकरी नोंदीसाठी अडचणी येत असल्याने त्रस्त आहे.
दौंड महसूल विभागांतर्गत महसुलीदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारी अनेक गावे यवत मंडल अंतर्गत येतात. यातील बहुतांश गावे आता पुणे महानगर प्राधिकरण अंतर्गत येत आहेत. महसूल विभागाचा कार्यभार आॅनलाइन झाल्यापासून बदलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकरीवर्गाला होऊन वेगाने कामे होतील, अशी अपेक्षा सर्वांना होती.
मात्र, अगदी उलट पद्धतीने कारभार सुरू असल्याने याचा त्रास शेतकरीवर्गाला सहन करावा लागत आहे. सातबाऱ्यावर नोंदी कराव्यात, यासाठी वारंवार तलाठी कार्यालयात खेट्या मारण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. सुरुवातीच्या काळात सर्व्हर जाम असल्याने नोंदी होत नसल्याच्या अडचणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता नोंदी मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. नोंदीच होत नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे अडकून पडत आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणीबरोबरच ई-सेवा केंद्रातून अनेक दाखले काढत असताना प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. यासाठी प्रतिज्ञापत्रावर मंडल अधिकाऱ्याची सही आवश्यक असते. परंतु कायमस्वरूपी मंडल अधिकारी नसल्याने तेथेही अडचण निर्माण होते. यामुळे आता लवकरात लवकर कायमस्वरूपीचा मंडल अधिकारी नेमावा, अशी आग्रही मागणी परिसरातून केली जात आहे.
>वास्तविक सातबारावर नोंदीसाठी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत नोंद होणे आवश्यक असते. परंतु तसे न होता अनेक दिवसांच्या नोंदी रखडून राहत आहेत. १ जानेवारी २०१६ नंतरच्या अनेक नोंदीचे अर्ज असताना केवळ काहींच्या नोंदी झाल्या आहेत.
प्रांत अधिकारी समीर शिंगटे व दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
केवळ त्या वेळी कार्यभार असणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या अर्जदारांच्या नोंदी केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यासाठी महसूल विभागातील दप्तर तपासल्यास यातील मधल्याअधल्या नोंदी कशा पद्धतीने होतात याची चौकशी तहसीलदार यांनी करून संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणे गरजेचे आहे.