घर विकणा-या प्रकल्पग्रस्तांना बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:55 AM2018-02-28T03:55:03+5:302018-02-28T03:55:03+5:30
प्रकल्पात बाधित झाल्यानंतर मिळालेले पर्यायी घर परस्पर विकून पुन्हा त्याच ठिकाणी ठाण मांडणा-यांना आता चाप बसणार आहे. प्रकल्पग्रस्तांना सदनिका जाहीर झाल्यानंतर त्याची
मुंबई : प्रकल्पात बाधित झाल्यानंतर मिळालेले पर्यायी घर परस्पर विकून पुन्हा त्याच ठिकाणी ठाण मांडणा-यांना आता चाप बसणार आहे. प्रकल्पग्रस्तांना सदनिका जाहीर झाल्यानंतर त्याची यादीच महापालिका संकेतस्थळावरून जाहीर करणार आहे. त्यामुळे नियमांप्रमाणे दहा वर्षांच्या आत घर विकण्यास निर्बंध येणार आहेत.
पालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित कुटुंबांना मोफत घर दिले जाते. अनेकवेळा अशी पयार्यी घर सोयीच्या ठिकाणी नसतात. महापालिकेच्या नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना दहा वर्षे घर विकता येत नाही. मात्र चांगली किंमत मिळाल्यास या घरांची काही दिवसांतच विक्री केली जाते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी ठरावाच्या सुचनेद्वारे भाजपच्या तत्कालीन नगरसेविका मनिषा चौधरी यांनी २०१३ मध्ये केली होती. याबाबत पाच वर्षांनंतर पालिका प्रशासनाने सुधार समितीत माहिती सादर केली आहे.
त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना घरे वितरीत करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्यात प्रकल्पाच्या माहितीसह प्रकल्पग्रस्तांची संपूर्ण माहिती संग्रहित करुन ती संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे घरं विकण्याच्या प्रकाराला लगाम लागेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.