संतप्त जमावाने दिला आरोपीला चोप
By admin | Published: September 16, 2016 01:56 AM2016-09-16T01:56:59+5:302016-09-16T01:56:59+5:30
गणपती पाहायला ट्रॅक्टरने जाणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर अडवून काही तरूणांनी महिलांची छेड काढून दोन तरूणांना मारहाण केली.
तुमसर (भंडारा) : गणपती पाहायला ट्रॅक्टरने जाणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर अडवून काही तरूणांनी महिलांची छेड काढून दोन तरूणांना मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता पवनारखारी मार्गावर घडली. यात दोन तरूण जखमी झाले. दरम्यान मारहाण करणाऱ्या तरूणांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने गोबरवाही पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यावेळी मारहाण करणारा तरूण ठाण्यात माहीत असल्याचे कळताच संतप्त नागरिकांनी त्याला ठाण्याबाहेर काढून चोप दिला.
यावेळी काही काळासाठी तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेत राजेंद्र इळपाते (२०) आणि मुकेश गेडाम (२०) हे गंभीररित्या जखमी झाले. त्या दोघांनाही रात्रीच गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते.
पवनारखारी येथे गणपती पाहायला गोबरवाही व परिसरातील महिला ट्रॅक्टरने जात होत्या. दरम्यान, रस्त्यात काही तरूणांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकास मारहाण केली. ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या आदिवासी तरूणीची छेड काढली. याप्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार नोंदविण्यात आली. दुपारच्या सुमारास आदिवासी महिला, तरूणी, पुरूष तथा ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पाहतापाहता शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमा झाला. या तरूणांना अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, आमदार चरण वाघमारे यांनी गोबरवाही येथे पोलीस ठाण्यात आंदोलकांशी चर्चा करुन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, जि.प. सदस्य संदीप टाले, प्यारेलाल धारगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नौशाद खान पठाण (२५), पीयूष पांडे (२२), जीतू नेवारे (२५) यांच्याविरूद्ध भादंवि ३४१, ३२४, ५०६, आर्म्स अॅक्ट ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. यातील तीन आरोपी फरार आहेत.(तालुका/शहर प्रतिनिधी)