समृद्धी महामार्गाला विरोध करणा-यांना चॅप्टर नोटीस
By admin | Published: March 20, 2017 03:37 PM2017-03-20T15:37:50+5:302017-03-20T15:37:50+5:30
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या जमीन मालकांना चॅप्टर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला विरोध करणा-या जमीन मालकांना चॅप्टर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कल्याण, भिवंडी आणि शहापूर प्रशासनानं या नोटीसा बजावल्या असून नोटीसांद्वारे सर्व जमीन मालकांना बोलवणं धाडण्यात आलं आहे. जमीन मालकांशी चर्चा करुन उपाय काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत असून जमीन मालकांशी समोरासमोर चर्चा करुन महामार्गाचे फायदे सजमावून सांगण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. मात्र जमीन मालकांनी या नोटीसांना धुडकावत केराची टोपी दाखवली आहे. प्रशासन चॅप्टर नोटीसआड आपल्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप जमीन मालकांनी केला आहे. चर्चेला गेल्यास आपल्याकडून बॉन्ड लिहून घेतले जाण्याचा संशयही जमीन मालकांना वाटतोय.
समृद्धी महामार्गात कल्याण, भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. त्यापैकी कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, रुंदे, उतणे, गुरवली, निंबवली, राया, दानबाव, चिंचवली येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जागा महामार्ग व स्मार्ट सिटीत बाधित होत आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांनी वारंवार बैठका, सभा घेऊनही सरकारी अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी सीमांकन, मोजणी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत, तर प्रशासन का जबरदस्ती करून ही कामे करत आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला होता.
७०२ किमी लांबीचा हा महामार्ग १० जिल्हे, २४ तालुके व ३८५ गावांना जोडणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर प्रवासाचा कालावधी १६ तासांवरून घटून अवघ्या ८ तासांवर येईल.