भाजयुमो अध्यक्षावर अश्लील वर्तनाचा आरोप, पक्षातून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2016 08:10 PM2016-03-26T20:10:55+5:302016-03-26T20:13:09+5:30
मुंबई भाजपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी मथुरा येथील दौर्यावेळी आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप भाजयुमोच्या महिला पदाधिकार्याने केला असून गणेश यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
मुंबई, दि. २६ - मुंबई भाजपाच्या युवा शाखेचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी मथुरा येथील दौर्यावेळी आपल्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप भाजयुमोच्या महिला पदाधिकार्याने केला आहे. हा आरोप तसेच अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर भाजयुमोची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच पांडे यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी चालू असताना भाजयुमोतील हा अश्लील वर्तनाच्या आरोपामुळे मुंबई भाजपात खळबळ उडाली आहे. मथुरा येथे ४,५ आणि ६ मार्च दरम्यान भाजयुमोच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. याला मुंबईतील पदाधिकार्यांनीही हजेरी लावली होती. या दौ-यात अध्यक्ष गणेश पांडे यांनी एका महिला उपाध्यक्षाशी अत्यंत असभ्य वर्तन करत अश्लील शेरेबाजी केली.त्याची लेखी तक्रारच पीडित महिलेनेच केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आणि सहसंघटन मंत्री सुनिल कर्जतकर यांनी पांडे आणि तक्रारदार महिला पदाधिकार्यास बाजू मांडण्यास सांगितले. त्यातच पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप उपाध्याय आणि त्यांच्या सहका-यावर जीवघेणा हल्ला झाला. (प्रतिनिधी)
दरम्यान गटबाजीमुळे उपाध्याय यांच्यावर हल्ला झाला असून त्यामागे गणेश पांडे गटाचा हात असल्याची जोरदार चर्चा पक्षात सुरु होती. या पार्श्वभूमीवर सुमारे ७० जणांची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्तीचा निर्णय पक्षाने घेतला आहे.