एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:27 PM2021-02-01T21:27:00+5:302021-02-01T21:27:34+5:30
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवाचा पोलिसांकडे तक्रार अर्ज
पुणे : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी एल्गार परिषदेत ‘हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है’ आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ’मी भारतीय संघराज्य मानत नाही’ अशी प्रक्षोभक विधान करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची ही विधाने भारतीय दंडसंहितेच्या 153अ व 295अ तसेच 124अ या कलमांनुसार गुन्हा ठरणारी आहेत. त्यामुळे उस्मानी यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनला दिला आहे.
शनिवारी (दि.30) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली, हिंदू समाज सडलेला आहे असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा अर्ज आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिला आहे. त्यांनी चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करीत राहाणार असल्याचे अँड प्रदीप गावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
-------------------------------------