एफटीआयआय विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र तयार
By admin | Published: March 12, 2016 01:41 AM2016-03-12T01:41:13+5:302016-03-12T01:41:13+5:30
आंदोलनाची तोफ थंड करण्यासाठी एफटीआयआय प्रशासनाने २००८ बॅचच्या ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमपान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात
पुणे : आंदोलनाची तोफ थंड करण्यासाठी एफटीआयआय प्रशासनाने २००८ बॅचच्या ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमपान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घातला होता. तब्बल सात महिन्यांनंतर आणखी १८ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.
हे आरोपपत्र सोमवारी (दि. १४) जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, नव्याने आरोपपत्र दाखल केलेल्या १८ विद्यार्थ्यांसह पूर्वी जामीन मिळालेले १२ अशा एकूण ३० विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर राहण्याच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत.
एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंंदोलनाची धार कमी करण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला होता.
याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयातच त्यांना घेराव घातला होता.
संचालकांना घेराव घातल्याप्रकरणी १७ विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यात १२ विद्यार्थ्यांना जामीन देण्यात आला आणि पुणे सोडून जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाला सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला. दरम्यान, आंदोलन मागेही घेण्यात आले. (प्रतिनिधी)