'त्या' घटनेतील सर्व आरोपींवर दोषारोपपत्र दाखल, पोलीस अधीक्षकांचा नीलम गोऱ्हेंना अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:03 PM2024-01-23T14:03:39+5:302024-01-23T14:04:11+5:30
पीडीत मुलीस बालकल्याण समिती उल्हासनगर यांचे समक्ष हजर करून तिचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे ठाणे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली होती. सदर घटनेची महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ गंभीर दखल घेत आरोपीवर कारवाई करण्याचे लेखी निर्देश २१ ऑक्टोबर २०२३ रोजी दिले होते. त्याची ठाणे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करत कडक कारवाई केली आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना सादर केला आहे.
या अहवालामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच इतर चार आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृह भिवंडी येथे दाखल केले आहे. तसेच, पीडितेच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तिला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देणेचा प्रयत्न सुरू आहे. पीडीत मुलीस बालकल्याण समिती उल्हासनगर यांचे समक्ष हजर करून तिचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे ठाणे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
पोलिसांनी तत्परतेने घटनेची सखोल चौकशी करून आरोपीस तात्काळ अटक केली. तसेच याबाबत आवश्यक अहवाल केला. या कारवाईबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर घटनेवर यापुढेही लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.