प्रभारी हेच कारभारी

By Admin | Published: January 11, 2017 04:30 AM2017-01-11T04:30:01+5:302017-01-11T04:30:01+5:30

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महत्त्वाची पदे गेल्या काही वर्षांपासून प्रभारीच असून संपूर्ण विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच सुरू आहे.

In charge is the steward | प्रभारी हेच कारभारी

प्रभारी हेच कारभारी

googlenewsNext

संदीप भालेराव / नाशिक
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महत्त्वाची पदे गेल्या काही वर्षांपासून प्रभारीच असून संपूर्ण विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच सुरू आहे. विशेष म्हणजे प्रभारी पदांचे अधिकार मर्यादित असतानाही येथे मात्र त्यांनी पूर्ण अधिकार बहाल करण्यात आले आहेत. कुलगुरू सोडले तर इतर महत्त्वाची पदे प्रभारी आहेत.
अपुरे मनुष्यबळ आणि कामाच्या ताणामुळे विद्यापीठाच्या विभाजनासारखा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाही त्यातून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे दिसते. विद्यापीठाचा कारभार हा फंडातील कर्मचारी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांवरच सुरू असल्याचे खुद्द येथील अधिकारीच सांगत असताना महत्त्वाची पदेदेखील भरली जात नाहीत.
विद्यापीठात सध्या कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा संचालक, युजी फॅकल्टी ही सारी पदे प्रभारी अधिकारीच सांभाळत आहेत. परीक्षा नियंत्रकांकडे कुलसचिवपदाची जबाबदारी असल्याने त्या विभागातील साहाय्यक कुलसचिव दर्जाचे अधिकारी कारभार पाहत आहेत. वित्त व लेखा अधिकाऱ्याचे पद पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रभारीच आहे.
सक्षम उमेदवार मिळत नसल्याने सदर पद हे प्रभारी ठेवण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या पदासाठी जाहिरातच काढलेली नाही. वास्तविक विद्यापीठ नियमाप्रमाणे कोणतेही पद हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रभारी ठेवता येत नाही, मात्र व्यवस्थापन परिषदेसमोरदेखील भरतीच्या जाहिरातीचा विषय काढण्यात आलेला नाही. गेल्या सात महिन्यांपासून कुलसचिवपदावर प्रभारी अधिकारीच आहे.
शासनाशी संघर्ष करून विद्यापीठासाठी पदे मंजूर करून आणल्याचे श्रेय कुलगुरूंसह कुलसचिव घेतात. मात्र रिक्त पदे भरण्याची तत्परता दाखविली जात नाही. शासन याबाबत नियमावली तयार करीत असून शासनाकडूनच विलंब होत असल्याचे विद्यापीठाकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनच पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे स्मरणपत्र विद्यापीठाला देण्यात आल्याचे समजते.
वैद्यकीय शिक्षण विभागाने ९ जून २०१६ रोजी ८३ पदे भरण्यास मंजुरी दिलेली आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून विद्यापीठाने पदे भरण्यासाठीची जाहिरातच दिलेली नाही.
विशिष्ट वर्गावर कृपादृष्टी
च्अंतर्गत बदल्यांमध्ये ‘विशिष्ट’ लोकांना महत्त्वाच्या शाखांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे तर काहींना शिक्षा म्हणून बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. काहींना तर पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ‘विशिष्ट वर्ग’ अशी संकल्पना सध्या विद्यापीठात राबविली जात आहे.
च्मागासवर्गीय कक्षाचा कारभार हा खुल्या संवर्गातील अधिकाऱ्याकडेच कायम ठेवण्यात आला आहे. या कक्षाच्या कामकाजावर वैद्यकीय महाविद्यालयांच्या तक्रारी असतानाही संबंधित अधिकारी पदावर कायम आहे.

Web Title: In charge is the steward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.