वसंतदादा बँक घोटाळाप्रकरणी ४० जणांवर आरोपपत्र
By admin | Published: August 9, 2016 03:06 PM2016-08-09T15:06:22+5:302016-08-09T15:06:45+5:30
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ४० जणांवर मंगळवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले
Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. ९ - अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर मंगळवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले. संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून आरोपांवरील म्हणणे मांडण्यासाठी २५ आॅगस्टरोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. माजी संचालकांमध्ये जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाºया या बँकेतील तत्कालिन संचालक, अधिकाºयांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्जप्रकरणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखाच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले आहेत. ३४ माजी संचालक व ७३ कर्मचाºयांची चौकशी होणार होती. मात्र चौकशीपूर्वी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पाच वर्षांपेक्षा जुन्या प्रकरणांना वगळण्यात आले. परिणामी चौकशीतून चार माजी संचालकांना वगळण्यात आले. निर्णय प्रक्रियेत नसलेल्या ७३ पैकी ६९ कर्मचाºयांना चौकशी अधिकाºयांनी तर दोन वरिष्ठ अधिकाºयांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वगळले आहे. कर्मचाºयांपैकी आता केवळ दोनच अधिकाºयांवर आरोप ठेवले आहेत.
निष्कर्षांमध्ये चौकशी अधिकाºयांनी म्हटले आहे की, माजी संचालकांनी संस्थेच्या हितापेक्षा हितसंबंध जोपासण्यावर भर दिला. तज्ज्ञ संचालक असलेल्या चौघांनी स्वत:च्या नावे प्रतिज्ञापत्र तयार करून कर्जवाटपाच्या बैठकीस उपस्थिती दर्शविली. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर संस्थेच्या नव्हे, तर संबंधितांच्या हितासाठी केला. आरोप ठेवण्यात आलेले तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूपाल दत्तात्रय चव्हाण आणि कर्जविभागप्रमुख प्रकाश बापूराव साठे या दोघांनी त्यांच्या अधिकाराचा वापर संस्थेच्या हितासाठी करणे आवश्यक होते. चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप होत असल्याचे माहिती असूनही त्यांनी यात सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे ते या प्रकरणांना जबाबदार आहेत.
नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाºयांचा समावेश होता. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. माजी संचालकांपैकी चारजणांना चौकशीतून वगळले आहे. उर्वरित ३0 माजी संचालकांपैकी माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते मदन पाटील यांच्यासह तिघांचे निधन झाले आहे. त्यामुळे तिघांच्या ११ वारसदारांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.