राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार, अजित पवारांविरोधात आरोपपत्र दाखल
By Admin | Published: September 15, 2015 11:04 AM2015-09-15T11:04:20+5:302015-09-15T11:04:39+5:30
सिंचन घोटाळ्यापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवार व अन्य नेत्यांच्या अ़डचणीत भर पडली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ - सिंचन घोटाळ्यापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवार व अन्य नेत्यांच्या अ़डचणीत भर पडली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी बँकेच्या संचालक मंडळावर राहिलेल्या ७६ नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकार बँकेत २००७ ते २०१० या कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहारात १०८६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपींमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे. चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप, धोरण नसताना परदेश वारी, मालमत्तांची विक्री करताना बँकेचे नुकसान करणे असे आरोप बँकेच्या माजी संचालकांवर लावण्यात आले आहे. माजी संचालक मंडळांमध्ये अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ, भाजपा नेते पांडुरंग फुंडकर, काँग्रेस खासदार रजनी पाटील या नेत्यांचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. आरोपपत्र दाखल झाल्याने या नेत्यांभोवती कायद्याचा फास आवळला आहे.