छोटा राजनवर पुरवणी आरोपपत्र दाखल
By admin | Published: August 6, 2016 05:11 AM2016-08-06T05:11:50+5:302016-08-06T05:11:50+5:30
ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने विशेष मकोका न्यायालयात कुख्यात गँगस्टर छोटा राजनवर आरोपपत्र दाखल केले
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआयने विशेष मकोका न्यायालयात कुख्यात गँगस्टर छोटा राजनवर आरोपपत्र दाखल केले. जे. डे अंडरवर्ल्डवर पुस्तक लिहीत होते, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी डे यांची हत्या करण्यात आली, असा दावा सीबीआयने आरोपपत्राद्वारे केला आहे.
५ जुलैला विशेष मकोका न्यायालयाचे न्या. एस. एस. आडकर यांनी सीबीआयला एका महिन्यात जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले होते. अन्यथा मुंबई क्राइम ब्रँचने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसारच आरोप निश्चित करण्याची तंबी दिली होती. सीबीआयने शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. ४१ जणांची साक्ष नोंदवली आहे. अन्य आरोपी रवी राम याला साक्षीदार केले आहे.
‘रवी राम याला आधीच साक्षीदार करण्यात आले होते. मात्र राजन आणि अन्य आरोपींमध्ये रवी राम महत्त्वाचा दुवा असल्याचे नंतर समजले,’ असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. रामने राजनच्या सांगण्यावरून मोबाइलची २० सीमकार्ड्स मारेकऱ्यांना व या कटात सहभागी असलेल्यांना पुरवली होती. आरोपपत्रात पोलिसांनी पत्रकार जिग्ना वोरा आणि छोटा राजनमधील संवादाचे ट्रान्सस्क्रिप्टही जोडले आहे.
जे. डे अंडरवर्ल्डवर पुस्तक लिहीत होते, त्यांना रोखण्यासाठी छोटा राजनने डे यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. डे यांनी छोटा राजनवर काही लेख लिहिले होते म्हणून राजन अस्वस्थ होता. पत्रकार वोरा हिचे डे यांच्याशी व्यावसायिक वैमनस्य असल्याने तिने छोटा राजनला डे यांच्याविरुद्ध चिथावले. २०११मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले. सतीश कालीया, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश आगवने, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ आणि दीपक सिसोदिया हे आरोपी आहेत. २०१२ला वोरावर पुरवणी आरोपपत्र दाखल केले. सध्या ती जामिनावर आहे. (प्रतिनिधी)