‘चारित्र्यवान’च पोलिंग एजंट
By admin | Published: February 10, 2017 03:29 AM2017-02-10T03:29:45+5:302017-02-10T03:29:45+5:30
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांसह उपद्रवी घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा धडाका लावलेला असतानाच मतदारांना
पुणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांसह उपद्रवी घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा धडाका लावलेला असतानाच मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत त्यांना पोलिंग एजंट म्हणून नेमण्यास पोलीस मज्जाव करणार आहेत. पोलिंग एजंटसाठी ज्यांची नावे दिली जातील, त्यांची चारित्र्य पडताळणी करण्याचे बंधन पोलीस घालणार आहेत.
पुणे महापालिकेच्या १६२ तर पिंपरी- चिंचवडच्या १२८ जागांसाठी होणारी निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. उमेदवारांचा प्रचार धडाक्यात सुरू झालेला असतानाच प्रशासकीय पातळीवरही कामाची लगबग सुरू झालेली आहे. पोलिसांसाठी तर ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती आहे. प्रचारापासून ते निकाल लागेपर्यंत कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. यासोबतच गुप्त अहवाल तयार करण्याचे आणि सर्व प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्याची दुहेरी जबाबदारीही पोलिसांना पार पाडावी लागत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली असून, अनेक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेले आहे. यासोबतच उपद्रवी आणि मतदारांवर प्रभाव पाडू शकणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान कक्षांमध्ये सर्व पक्षांकडून नेमण्यात आलेले पोलिंग एजंट बसवले जातात. या पोलिंग एजंटची नावे आधीच आयोगाकडे द्यावी लागतात. त्यांना नेमके काय करायचे असते, याचेही प्रशिक्षण दिले जाते. अनेकदा हे पोलिंग एजंट स्थानिक, किंबहुना राजकीय पक्षांशी संबंधित असतात.