मुंबई-पुणे महामार्गावर चक्का जाम
By Admin | Published: January 1, 2017 08:53 PM2017-01-01T20:53:57+5:302017-01-01T20:53:57+5:30
नववर्षाचे स्वागत करून परत मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 1 - नववर्षाचे स्वागत करून परत मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. मुंबई-पुणे व गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. कळंबोली ते कोन गावापर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील हजारो नागरिक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळा, महाबळेश्वर, अलिबाग, माथेरान व इतर ठिकाणी गेले होते. या परिसरातील सर्व हॉटेल्स हाउसफुल्ल झाली होती.
रविवारी सायंकाळी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. पनवेलजवळील कोनगाव ते कळंबोलीपर्यंत दहा मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता. रात्री आठनंतर सीबीडी परिसरामध्येही वाहतूककोंडी निर्माण झाली होती. वाहतूक कोंडी व हॉर्नचा कर्कश आवाज, यामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती. सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने कामोठेजवळ काम पूर्ण केलेले नाही. अर्धवट कामाचा फटकाही वाहतुकीला बसला.
मानसरोवर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या जोडरस्त्याजवळ वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय उड्डाणपुलावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यानेही वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असल्याने, प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चौकट निकृष्ट कामाचा फटका सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम योग्य प्रकारे झाले नाही. कामोठे, खारघर परिसरात काम रखडले आहे. भुयारी मार्ग बंद असल्याने, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागत असल्याने, वाहने धिम्या गतीने चालवावी लागत आहेत. यामुळे रविवार व इतर सुट्ट्यांच्या दिवशी सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(छायाचित्र - भालचंद्र जुमलेदार)