चार्ल्स कोरिया यांचे निधन
By admin | Published: June 18, 2015 02:58 AM2015-06-18T02:58:37+5:302015-06-18T02:58:37+5:30
भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा अशी ओळख असलेले चार्ल्स कोरिया यांचे मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.
मुंबई : भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा अशी ओळख असलेले चार्ल्स कोरिया यांचे मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोरिया यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिली.
१९७० ते ७५ सालादरम्यान नवी मुंबईचे मुख्य वास्तुविशारद म्हणून चार्ल्स कोरिया यांनी काम पाहिले. नवी मुंबईसारख्या जुळ्या शहरामुळे मुंबई शहरातील रहिवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे मुंबईतील सुमारे २० लाखांहून अधिक नागरिक नवी मुंबईत स्थलांतरित झाले. नवी मुंबई शहराची उभारणी करताना त्यांनी डिझाइनमध्ये ‘ओपन टू स्काय’ पॅटर्नला प्राधान्य देत स्थानिक तंत्राचा वापर केला होता. नवी मुंबई, बेलापूर येथे आर्टिस्ट व्हिलेज कलाग्रामचे डिझाइन त्यांनी केले होते.
सीबीडी येथे विविध क्षेत्रांतील कलावंतांसाठी उभारण्यात आलेल्या आर्टिस्ट व्हिलेजची संकल्पना त्यांचीच होती. त्याशिवाय इन्क्रिमेंटल हाऊस अर्थात बैठ्या घराचे वाढीव बांधकाम ही संकल्पना सुद्धा त्यांनीच आणली होती. त्यामुळेच आज शहरात विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या बैठ्या घरांचे गरजेनुसार वाढीव बांधकाम करता येणे शक्य झाले आहे.