चारमोळीने पाषाण फोडले अन् माझे हृदय हेलावले!
By Admin | Published: May 10, 2017 02:01 AM2017-05-10T02:01:29+5:302017-05-10T02:01:29+5:30
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या पातूर तालुक्यातील चारमोळी गावाने काळा पाषाण फोडून जलसंधारणाची
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या पातूर तालुक्यातील चारमोळी गावाने काळा पाषाण फोडून जलसंधारणाची कामे केली आहेत. त्यांच्या कामाची माहिती मिळताच माझे हृदय हेलावले आणि मी या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला, असे भावुक प्रतिपादन अभिनेता आमीर खान यांनी मंगळवारी केले.
चारमोळी येथे जलसंधारणाच्या कामांची पाहणी व ग्रामस्थांशी हितगुज साधण्यासाठी आमीर खान व त्यांच्या पत्नी किरण राव आले होते. ग्रामसभेत ते म्हणाले की, चारमोळी गावाने वॉटर कप स्पर्धेसाठी दुप्पट श्रमदान केले. आदिवासीबहुल असलेल्या गावात एक वेळ श्रमदान व दुपारी मजुरी करून ग्रामस्थ जलसंधारणाची कामे करीत आहेत. त्यामुळे या गावाचा राज्यातील इतर गावे आदर्श घेतील. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे गेल्या वर्षापासून सुरू झाली आहेत आणि ती कामे सुरूच राहणार आहेत. त्यामुळेच आपले राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल, असा विश्वासही आमीर खान यांनी व्यक्त केला. पाणीटंचाईवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन उपाय शोधला आहे. ही सुरुवात आहे. या श्रमदानाच्या कामांमधून लोकांमध्ये एकी निर्माण होत आहे. त्यामुळे इतर कुठल्याही समस्येवर ग्रामस्थ स्वत:च उपाय शोधू शकतात.
आमीर खान यांनी चारमोळी गावात श्रमदानातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच श्रमदान करणाऱ्यांबरोबर हितगुज केले. त्यांच्याकडून श्रमदानाविषयी माहिती घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अकोला जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील गावांमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती त्या-त्या तालुका समन्वयकांकडून त्यांनी जाणून घेतली. शेवटी ग्रामसभेत ग्रामस्थांच्या भजनात आमीर खान व किरण राव तल्लीन झाले होते. गावाला वॉटर कप जिंकण्याच्या शुभेच्छा देऊन त्यांनी ग्रामस्थांचा निरोप घेतला.