खुर्ची, टेबल, प्रसाधनगृहाचे शिक्षकांकडून भाडे वसूल
By Admin | Published: October 6, 2014 05:19 AM2014-10-06T05:19:40+5:302014-10-06T05:19:40+5:30
साकीनाका येथील शिवनेर विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षकांंकडून कोणतीही वस्तू वापरल्यास त्यासाठी वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे
मुंबई : साकीनाका येथील शिवनेर विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षकांंकडून कोणतीही वस्तू वापरल्यास त्यासाठी वसुली केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थाचालकाने खुर्ची, टेबल, मुतारी, प्रसानगृहाच्या वापरासाठी शिक्षकांकडून पैसे वसुलीसाठी एका शिपायाची नेमणूक केली असून, यासाठी उपमुख्याध्यापिकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
शिवनेर विद्यामंदिर हायस्कूल बंद करण्यासाठी संस्थाचालकांने यापूर्वी अनेक प्रकारच्या बळाचा वापर केला आहे. याविरोधात शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. संस्थाचालकाकडून शाळा अडचणीत असल्याचे कारण पुढे करीत शिक्षकांकडून वसुली करीत असल्याचा आरोप शिक्षकाकडून होत आहे. याबाबत बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयात सुनावणीही झाली होती. यावर शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाने शाळेला पत्र पाठविले असून, शाळेने तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
शाळेतील शिक्षकांनी खुर्चीचा वापर केल्यास त्यासाठी पाच रुपये, टेबलसाठी दहा रुपये, मुतारीसाठी २ रुपये व प्रसाधनगृहासाठी पाच रुपये वसूल करण्यात येत आहेत. तसेच एका उपमुख्याध्यापिकेचाही यामध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शाळेतील उपमुख्याध्यापक महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवा शर्ती) नियमवली- १९८१ मधील नियम ४ नुसार जबाबदारी पार पाडत नसून, यामुळे नियमांचे उल्लंघनही केले जात असल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)