छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक प्रेरणेचं केंद्र : मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 06:52 PM2018-03-31T18:52:34+5:302018-03-31T18:52:34+5:30
शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.
अन्याय, शोषण यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लढणाऱ्या जगातील तमाम लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणेचं केंद्र आहेत. संघटित शक्तीच्या आधारावर समाजाचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते शनिवारी रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराकडे कानाडोळा करून भारताचा विकास केला जाऊ शकत नाही. जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. मोहन भागवत यांना कार्यक्रमाला बोलावल्यामुळे अदिती तटकरे वादात अडकल्या होत्या. अखेर यावरून सुनिल तटकरे यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती.