‘आदर्श’प्रकरणी चव्हाण आरोपीच
By admin | Published: March 5, 2015 02:08 AM2015-03-05T02:08:05+5:302015-03-05T02:08:05+5:30
काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांचे नाव बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून वगळण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा नकार दिला़
हायकोर्टाचा पुन्हा दणका : घोटाळ्यातून नाव वगळण्यास नकार
मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांचे नाव बहुचर्चित आदर्श इमारत घोटाळ्यातून वगळण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा नकार दिला़ त्यामुळे चव्हाण यांच्याविरोधात आता याबाबतच्या खटल्याची सुनावणी
सुरू होईल़
माजी राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी या घोटाळ्याप्रकरणी खटला चालवण्यास सीबीआयला परवानगी नाकारली होती़ त्यानुसार या खटल्यातून त्यांचे नाव वगळण्यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला़ मात्र चव्हाण यांच्याविरोधात कट व कारस्थानाचा खटला चालवण्यास राज्यपाल यांनी नकार दिला असला, तरी त्यांनी या सोसायटीवर मेहरनजर केल्याचा आरोपही आहे़ त्यामुळे या गुन्ह्यासाठी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालू शकतो, असा निर्वाळा विशेष न्यायालयाने दिला़ विशेष न्यायालयाच्या या आदेशाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले़ उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचे आदेश कायम ठेवले़
अखेरचा पर्याय म्हणून चव्हाण यांनी स्वतंत्र अर्ज करून नाव न वगळण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती केली़ त्यावर न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्यासमोर सुनावणी झाली़ न्या़ ताहिलयानी यांनी बुधवारी चव्हाण यांचा हा अर्जही फेटाळला़ (प्रतिनिधी)
स्वतंत्र अर्जही न्यायालयाने फेटाळला
आदर्श घोटाळा प्रकरणाच्या खटल्यातून नाव न वगळण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी अशोक चव्हाण यांनी स्वतंत्र अर्ज केला होता. मात्र हा अर्ज न्या. ताहिलयानी यांनी फेटाळला. आता चव्हाण यांच्याविरोधात खटल्याची सुनावणी सुरू होईल.