सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू - चव्हाण
By admin | Published: March 3, 2015 02:31 AM2015-03-03T02:31:16+5:302015-03-03T02:31:16+5:30
पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे.
मुंबई : पक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे. केवळ विरोधाला विरोध ही काँग्रेसची भूमिका नाही तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी, केंद्र आणि राज्य शासनाचा कारभार, शेतकरी आत्महत्या, स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव, आघाडीचे राजकारण आणि आदर्श प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निकालांनी आव्हानात्मक परिस्थिती स्पष्ट केली आहे. ज्या जिल्ह्यात पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे तिथे अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. लवकरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जिल्हावार दौरे करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आपली भूमिका असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सरकारमध्ये राहून शिवसेना वेगळी भूमिका कशी घेते? भूसंपादनाला त्यांचा खरोखरच विरोध असे तर त्यांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडावे, असा टोलाही चव्हाण यांनी हाणला. शेतकरी आत्महत्या आणि स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत. माझ्या कार्यकाळातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या. तसे आता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले.
फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात विचारांची लढाई लढावी लागेल. हा केवळ पोलीस बंदोबस्ताचा विषय नाही. सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन काम करू. राष्ट्रवादीसोबत आपले ट्युनिंग चांगले आहे. पण जिथे पटणार नाही तिथे विरोध करणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू
एमआयएमप्रमाणे मुस्लीम लीगचाही उदय नांदेडमध्येच झाला. भावना भडकावण्याचे राजकारण फार काळ टिकणार नाही. एमआयएमचा प्रभाव जसा वाढला तसाच तो लवकरच नष्टही होईल. पण आगामी निवडणुकीत एमआयएमला ‘व्यवस्थित’ हाताळू, असे चव्हाण म्हणाले.