भुजबळांबाबतच्या लक्षवेधीला चव्हाण यांचा विरोध
By admin | Published: March 17, 2016 12:49 AM2016-03-17T00:49:41+5:302016-03-17T00:49:41+5:30
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असताना काही वर्षांपूर्वी त्यांचे नाव ज्या प्रकरणात घेतले गेले होते त्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याबाबतची लक्षवेधी सूचना
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असताना काही वर्षांपूर्वी त्यांचे नाव ज्या प्रकरणात घेतले गेले होते त्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याबाबतची लक्षवेधी सूचना राखून ठेवण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत केली.
भुजबळ अडचणीत असताना चव्हाण यांनी घेतलेल्या या पवित्र्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मूळ लक्षवेधी ही नवी मुंबईत बनावट मुद्रांक शुल्क तयार करून विकणाऱ्या व्यक्तीला झालेल्या अटकेबाबतची होती. सरदार तारासिंह, योगेश सागर या भाजपाच्या आमदारांनी ती मांडली होती.
तिला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नवी मुंबई येथे बनावट मुद्राक सापडले नव्हते, तर भंडारा येथून विकत घेतलेले मुद्रांक अयोग्य प्रकारे , तारखा बदलून वापरण्याचे हे प्रकरण आहे हे तेलगी सारखे प्रकरण नाही. तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नाशिकच्या फार्म हाऊस मध्ये करोडो रूपयांचे मुद्रांक सापडले होते, असा आरोप भाजपाचे सदस्य अनिल गोटे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)