राज्य सरकारकडून सीएचबी प्राध्यापक नियुक्ती प्रस्तावाला मिळेना मान्यता; महाविद्यालयात प्राध्यापकांचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:53 AM2020-08-24T10:53:16+5:302020-08-24T11:08:16+5:30
राज्यातील विद्यापीठातील व महाविद्यालयांमध्यील प्राध्यापकांची सुमारे ३० ते ४० हजार पदे रिक्त आहेत.
राहुल शिंदे
पुणे: राज्यातील अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत.परिणामी महाविद्यालयात तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांची नियुक्ती करून महाविद्यालयीन शैक्षणिक कामकाज चालविले जात आहे. परंतु,शासनाने सर्वच भरती प्रक्रियेवर बंदी घातली आहे.त्यामुळे सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीवरही परिणाम झाला असून उच्च शिक्षण संचालक कार्यालयाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव सुमारे महिन्याभरापासून शासनाकडे पडून आहे.
राज्यातील विद्यापीठातील व महाविद्यालयांमध्यील प्राध्यापकांची सुमारे ३० ते ४० हजार पदे रिक्त आहेत. राज्यात २०१२ पासून प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरळीतपणे राबविली गेली नाही. गेल्या आठ-दहा वर्षात सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे काही महाविद्यालयात विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील महत्त्वाच्या विषयांना एकही पूर्णवेळ प्राध्यापक नाही,अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी महाविद्यालयांना तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मदतीने शैक्षणिक कामकाज पूर्ण करावे लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विना अनुदानित महाविद्यालयांमधील सीएचबीवरील प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव येत्या ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहे.तर अनुदानित महाविद्यालयांमधील सीएचबी प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव वर्षभर स्वीकारले जातील,असे परिपत्रक विद्यापीठाच्या शिक्षक मान्यता कक्षातर्फे 13 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे.मात्र,मान्यता नसली तरी काही प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत.त्यामुळे या प्राध्यापकांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एम.फुक्टोचे सचिव प्रा.एस.पी.लवांडे म्हणाले, प्राध्यापकांची पूर्णवेळ नियुक्ती होत नसल्याने शिक्षण विभागाने तात्पूरती व्यवस्था म्हणून सीएचबीवरील प्राध्यापकांच्या नियुक्तीचा मार्ग स्वीकारला.आता सीएचबी प्राध्यापकांची भरतीही केली नाही तर महाविद्यालयांचे कामकाज करणे शक्य होणार नाही.त्यामुळे शासनाने तात्काळ सीएचबी प्राध्यापकांच्या भरतीला परवानगी द्यावी.
-------------------------------------------
कोरोनामुळे अनेक महाविद्यालयांनी आॅनलाईन पध्दतीने शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.मात्र,राज्य शासनाने सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीला मान्यता न दिल्या महाविद्यालयांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे शासनाने त्वरीत सर्व सहसंचालक कार्यालयांमार्फत महाविद्यालयांना सीएचबी प्राध्यापक नियुक्तीचे आदेश द्यावेत.
- प्रा.प्रकाश पवार,अध्यक्ष,शिक्षक हितरकारिणी संघटना,
------------------------------