गॅस एजन्सीच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Published: February 1, 2016 02:41 AM2016-02-01T02:41:30+5:302016-02-01T02:41:30+5:30
गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व गिरगावातील सुपर गॅस एजन्सी चालक मनदीप शहा
मुंबई : गॅस एजन्सी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व गिरगावातील सुपर गॅस एजन्सी चालक मनदीप शहा यांची अटक आता अटळ बनली आहे. शहा हे आॅल इंडिया एचपी गॅस डीलर असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज व त्यासाठी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मनदीप शहा यांच्या सांगण्यावरून शशिकांत तिवारी व कृष्णकांत तिवारी यांनी व्यावसायिक सैती यांना नवी मुंबईत गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिवारी यांनी महासंचालकांकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर तिवारी बंधूंना दिल्लीतून अटक करण्यात आली. फसवणुकीच्या प्रकाराची सुरुवात ठाण्यातील नवघर येथे झाल्याने दोन महिन्यांपूर्वी तेथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)