घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 03:54 AM2016-10-15T03:54:13+5:302016-10-15T03:54:13+5:30
इमारतीतील रिकामे घर हेरून ते मालकाच्या परस्पर भाड्याने देत असल्याचे सांगत लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या महाठगाला पवई पोलिसांनी शुक्रवारी बेड्या
मुंबई : इमारतीतील रिकामे घर हेरून ते मालकाच्या परस्पर भाड्याने देत असल्याचे सांगत लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या महाठगाला पवई पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. दिनेश मेस्त्री (४२) असे या आरोपीचे नाव असून त्याने आतापर्यंत मुंबईकरांना ६ ते ७ कोटी रुपयांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
पवईमधील एका इमारतीत फ्लॅट भाड्याने देण्याच्या बहाण्याने दिनेशने तक्रारदार इंदू बनपट्टी (५०) यांच्याकडून २ लाख ७७ हजार ५०० रुपये उकळले होते. दिनेशच्या सांगण्यानुसार इंदू या फ्लॅटमध्ये राहण्यास गेल्या असता मालकाच्या परस्पर फ्लॅट भाड्याने दिल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंंदू यांनी पवई पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. पवई पोलिसांनी दिनेशला बेड्या ठोकल्या.
आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये फ्लॅट भाड्याने देणारा दलाल असलेला दिनेश हा इमारतीचे अध्यक्ष, सचिव यांची भेट घेऊन इमारतीतील रिकामी फ्लॅटची माहिती घ्यायचा. त्यानंतर हा फ्लॅट मालकाच्या परस्पर भाड्याने देण्याचे सांगून ग्राहकांकडून रक्कम घेऊन पसार व्हायचा. दिनेशने तब्बल २७ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडे कसून चैकशी सुरू असल्याचे पोलीस प्रवक्ते पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)