जहाजावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By Admin | Published: August 24, 2016 05:05 AM2016-08-24T05:05:37+5:302016-08-24T05:05:37+5:30

पाच ते सहा तरुणांची १९ ते २० लाखांची फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अटक केली

Cheating by the job bait on the ship | जहाजावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक

जहाजावर नोकरीच्या आमिषाने फसवणूक

googlenewsNext


ठाणे : आखाती कंपनीच्या तेलवाहू जहाजावर नोकरी देण्याचे अमिष दाखवून पाच ते सहा तरुणांची १९ ते २० लाखांची फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख १४ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांच्या आणखी दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शशिभूषण सिंग, धीरजकुमार उर्फ मनोज संजयकुमार सिंग आणि अभिलाष कोरडे अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. नाशिकच्या भूषण जाधवने नवी मुंबईतील नेरुळ येथील एका संस्थेतून ‘डिप्लोमा इन नॉटीकल सायन्स’चे शिक्षण घेतल्यामुळे तो जहाजावरील अधिकारी पदाच्या नोकरीच्या शोधात होता. आखाती देशात नोकरीला लावणाऱ्या धीरजकुमार या एजंटच्या तो संपर्कात आल्यानंतर त्याने कोपरीतील ‘मातोश्री शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लि.’ या कंपनीचे संचालक शशिभूषण आणि सूर्यप्रकाश तिवारी यांची सर्व कागदपत्रांसह भेट घेण्यास सांगितले. या दोघांनीही त्याला दुबईतील तेलवाहू जहाजावर दरमहा ६०० अमेरिकन डॉलर (३९ हजार रुपये) वेतनाची नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी प्रवासखर्च स्वत: करावा लागेल. त्याव्यतिरिक्त साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. मुलाला चांगली नोकरी लागेल, या आशेपोटी भूषणच्या वडिलांनी त्यांची गावाकडील जमीन विकून तसेच उसनवारीने पैशांची उभारणी करून त्याला आखाती देशात नोकरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. धीरजकुमारच्या सांगण्यावरून भूषणने बंगळुरू येथील अरविंद गुप्ता याच्या बँक खात्यात ७ जुलै २०१५ रोजी दोन लाख रुपये जमा केले. त्याबदल्यात धीरजकुमारने अभिलाष कोरडे या आणखी एका एजंटच्या मदतीने त्याला नोकरीचे करारपत्र, इराणचा व्हिसा ही कागदपत्रे पाठवून, ८० हजार रुपये अमेरिकन डॉलरमध्ये रुपांतरीत करुन इराणच्या एजंटला देण्यास सांगितले. जहाज इराणला उभे असल्याचे सांगून दुबईऐवजी इराणला जावे लागेल, असेही सांगितले. इराणच्या बुशेर विमानतळाचे हवाई तिकीट स्वखर्चाने खरेदी केल्यानंतर भूषणने ८ जुलै रोजी इराणला जाऊन लिआॅन ओशन स्टार कंपनीचा एजंट विकास आणि राजू यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार १२०० यूएस डॉलरही त्यांना दिले. त्यांनीही दुबईच्या तेलवाहू जहाजावरील नोकरीऐवजी त्यांना इराण बुशेर येथील एका खोलीत भारतातून नोकरीसाठी आलेल्या २५ जणांसह डांबून ठेवले. एक महिना निकृष्ट जेवण देऊन त्यांचा छळ केल्यानंतर मासेमारी बोटीवर नोकरीला लावले. त्याठिकाणी सहा महिने काम करूनही त्यांना अवघ्या चार महिन्यांचा २०० डॉलर (केवळ १३ हजार रुपये) पगार दिला. त्याठिकाणी काम करताना इराणी क्रू मेंबर्सनी शिवीगाळ करणे, धमकी देणे, उपाशी ठेवणे असा छळही केला. या छळाला कंटाळून ते फेब्रुवारी २०१६ मध्ये भारतात पळून आले. (प्रतिनिधी)
>ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी दखल घेतल्याने लागला छडा
या प्रकरणातून कसेबसे सावरल्यानंतर त्याने आपबिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना कथन केली. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त नागेरश लोहार आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. दौंडकर यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. कोपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंततर मातोश्री शिप मॅनेजमेंटचा संचालक शशीभूषण रा. उल्हासनगर याला ३१ जुलैला अटक केली. त्यापाठोपाठ दोन लाखांची रोकड घेऊन पसार झालेला धीरजकुमार यालाही बिहारमधून ८ आॅगस्ट रोजी अटक केली. तर ठिकाण बदलणाऱ्या अभिलाष कोरडे याला पुण्याच्या शिवाजीनगर भागातून १६ आॅगस्ट रोजी अटक केली. शशिभूषण आणि धीरजकुमार यांना न्यायालयीन तर अभिलाषला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी अशाच प्रकारे आणखी पाच ते सहा जणांकडून प्रत्येकी साडेतीन लाखांची रोकड उकळल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. ही मुले परतल्यानंतर त्यातील तथ्य तपासण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.

Web Title: Cheating by the job bait on the ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.