सैन्य भरतीत लबाडी; ३७ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:52 AM2017-08-11T03:52:55+5:302017-08-11T03:52:59+5:30
बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय लष्करात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
औरंगाबाद : बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून भारतीय लष्करात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी सांगितले की, २०१५मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत औरंगाबादमध्ये झालेल्या भारतीय लष्कराच्या भरती मेळाव्यात हजारो तरुण सहभागी झाले होते. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यांनी दाखल केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी छावणीतील सैन्यभरती अधिकाºयांनी केली. त्यावेळी ३७ उमेदवारांनी औरंगाबाद, वैजापूर, धुळे, चाळीसगाव, साक्री आदी ठिकाणच्या तहसील कार्यालयांचे रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर केला. तथापि, या कागदपत्रांविषयी शंका वाटत असल्याने कॅप्टन मोहनपाल सिंग यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन याविषयी तक्रार दिली होती.
उमेदवारांनी सैन्य दलास सादर केलेले रहिवासी आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल्याची सत्यता पडताळण्यात आली. तेव्हा आरोपींनी संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकाºयांचा बनावट सही, शिक्का वापरून हे प्रमाणपत्र तयार केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी २३ मे २०१६ रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आणि याबाबतचा अहवाल सैन्य दलास देण्यात आला होता. आरोपींना छावणी पोलिसांनी बुधवारी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली.
तहसीलचे बनावट प्रमाणपत्र जोडले होते
काही आरोपी हे मूळचे सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ११ जवानांनी वैैजापूर तहसील कार्यालयाचे, अन्य ११ जवानांनी औरंगाबाद तहसील कार्यालयाचे, तर उर्वरित आरोपींनी जळगाव, धुळे, चाळीसगाव आणि साक्री तहसीलचे बनावट प्रमाणपत्र जोडले होते.