‘जनधन’च्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: May 3, 2015 01:11 AM2015-05-03T01:11:25+5:302015-05-03T01:11:25+5:30
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या प्रसारासाठी बेरोजगारांची भरती करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
विजय मोरे, नाशिक
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या प्रसारासाठी बेरोजगारांची भरती करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना लॅपटॉप, स्मार्ट फोन पुरवण्यात येत असल्याचेही आमिष जाहिरातींद्वारे दाखवले जात आहे.
जनधन योजनेचा प्रसार करण्यासाठी मुले / मुली हवी आहेत, मोबाइलवरून पार्ट / फुलटाइम लघुसंदेश (एसएमएस) पाठवून महिना १८ ते ६० हजार रुपये कमवा. या कामासाठी आवश्यक असलेला मोबाइल, लॅपटॉप फ्री़ अशा प्रकारच्या जाहिराती स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये देऊन बेरोजगारांची फसवणूक करण्याचा नवीन फंडा राज्यात सुरू झाला आहे़ नाशिकजवळील नानेगावमधील महाविद्यालयीन युवतीची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे़
बारावीची परीक्षा दिलेल्या भारती काळे या विद्यार्थिनीने जाहिरातीवरील नंबरवर आपला पत्ता पाठविला़ त्यानंतर बोगस कंपनीतील तोतया अधिकारी श्वेता रुही व अनुपम उपाध्याय यांनी फोन करून स्टेट बँक आॅफ इंडियातील खाते नंबर देऊन त्यावर २ हजार ६२५ रुपये भरण्यास सांगितले़ त्यानुसार भारतीने नानेगाव बँकेत रक्कम भरली असता रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर लॅपटॉप व मोबाइलसाठी आणखी ८ हजार ५००, ६ हजार आणि १० हजार रुपयांची मागणी भामट्यांनी केली व त्यानुसार भारतीने बँकेच्या नानेगाव व देवळाली शाखेत पैसे भरलेही़
भारतीला पुन्हा १३ हजार रुपये भरण्यास सांगून त्यानंतर तुमच्या अकाउंटवर १ लाख ४० हजार रुपये जमा होतील़ त्यातून तुम्ही शहरातील कोणत्याही दुकानातून लॅपटॉप व मोबाइल विकत घ्या व त्याचे बिल आम्हाला पाठवा. तसेच उर्वरित रक्कम तुमच्या कामाचा अॅडव्हान्स म्हणून स्वत:जवळ ठेवा, असे सांगितले, मात्र तिला संशय आला़ तिने पोलीस खात्यात कर्मचारी असलेल्या आपल्या आत्याला हा प्रकार सांगितला. त्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले़;मात्र तोपर्यंत सुमारे २७ हजारांची रक्कम संबंधित खात्यावर तिने भरली होती़
बेरोजगारांची नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे फसवणूक होत असून, तक्रारीसाठी कोणी पुढे आलेले नाही़ भारती मात्र पोलिसांत तक्रार नोंदविणार आहे़