‘नाना’च्या नावाने फसवणूक

By admin | Published: February 6, 2016 03:47 AM2016-02-06T03:47:13+5:302016-02-06T03:47:13+5:30

‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे

Cheating by the name of 'Nana' | ‘नाना’च्या नावाने फसवणूक

‘नाना’च्या नावाने फसवणूक

Next

नाशिक : ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून एकीकडे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत असताना, दुसरीकडे याच मदतीवर डल्ला मारण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे उघड झाले आहे. ‘नाम’ची मदत मिळालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना नाना पाटेकर यांचे नाव सांगून त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार झाल्याचे खुद्द मकरंद अनासपुरे यानेच नाशिकमध्ये सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना काही भामट्यांनी फोन केले. ‘तुम्हाला मदत म्हणून मिळालेल्या १५ हजारांपैकी तीन हजार रुपये अमुक खात्यावर जमा करा. तसे केल्यास नाना पाटेकर हे स्वत:च्या खात्यातून तुम्हाला पुन्हा एक लाख रुपयांची मदत देणार आहेत’, असे या कुटुंबांना सांगण्यात आले. अशा प्रकारे सहा कुटुंबांकडून पैसे उकळण्यात हे भामटे यशस्वी झाले; मात्र सातव्या वेळेला पकडले गेले. त्यामुळे नागरिकांनी फक्त ‘नाम’च्या अधिकृत खात्यावरच रक्कम जमा करावी व कोणाकडून रक्कम भरण्यासाठीचा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अनासपुरेने केले. नाम कोणाकडूनही रोख पैसे स्वीकारत नसून, केवळ ‘नाम’च्या अधिकृत खात्यावर धनादेश व अधिकर्षाद्वारेच पैसे स्वीकारले जातात. नानांच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे सगळे मेसेज बनावट आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये, असेही त्याने स्पष्ट केले.नाम फाउंडेशनच्या वतीने शंकराचार्य संकुल येथे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी जिल्ह्यातील ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी सुपूर्द केले. नाना पाटेकर म्हणाला, नुसते पाणी अडवा, पाणी जिरवा करून भागणार नाही, तर गावातून शहराकडे जाणारी मुले अडवा आणि त्यांना गावातच जिरवा. कारण ही मुले नव्या पद्धतीने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू शकतात. जुनी मंडळी तेवढ्या क्षमतेने हे करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम’ पुरी पडणार नाही. पण यानिमित्ताने आम्ही सरकारपुढे एक मॉडेल सादर केले. काही यंत्रणा नसताना आम्ही एवढे करू शकतो, मग तुम्ही का नाही, असा जाब आता विचारू शकतो.‘तिला का उठवलं?’
एका महिलेचे बाळ रडू लागल्याने स्वयंसेवकाने तिला उठून मागे जायला सांगितले. नानाने ते टिपून लगेच त्या स्वयंसेवकाला ‘तिला का उठवलं’ असा जाब विचारला. त्याने ‘बाळ रडत होतं’ असे उत्तर देताच ‘मग रडू दे की’ म्हणत त्या महिलेला नाना व मकरंद यांनी पुन्हा बसायला सांगितले. एका स्वयंसेवकाने शेतकऱ्याला ढकलल्याचे पाहूनही नाना चांगलाच संतापले. पाच लाख देतो, कार्यक्रमाला या... : आम्हाला वैयक्तिक पैसे नको. अनेकांचे फोन येतात. पाच लाख रुपये मदत देतो, आमच्या कार्यक्रमाला याल का, अशी विचारणा होते. हे गंभीर कार्य आहे. अगदी साहित्य संमेलनात एक कोटी रुपयांची मदत देऊनही ती स्वीकारण्यास ‘नाम’चा प्रतिनिधी नव्हता, हे मकरंद यांनी नमूद केले.

Web Title: Cheating by the name of 'Nana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.