Voice Call द्वारे शिंदे गटाकडून शिवसैनिकांची फसवणूक; ठाकरेंचा आरोप, काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:00 AM2022-10-28T11:00:37+5:302022-10-28T11:01:07+5:30
१ आकडा दाबल्यानंतर प्रणालीद्वारे तुम्ही शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होतो असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेच्या २ गटात चढाओढ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्हासाठी शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करण्यात आला. त्यात निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणूक लक्षात घेता दोन्ही गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास बंदी केली होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट बहुमत आमच्याकडेच आहे असा दावा करत आहे.
त्यातच उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटलंय की, राज्यात बेकायदेशीर सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे ९११७२५२४८२७५ या नंबवरून व्हाईस कॉल करून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. हा कॉल आल्यानंतर एक दाबा असे ते सूचना करत आहेत. १ आकडा दाबल्यानंतर प्रणालीद्वारे तुम्ही शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होतो असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
तसेच अशाच पद्धतीची यंत्रणा भाजपाच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता. राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी सोशल मीडियावरील शिवसैनिक, सर्व अंगीकृत संघटना यांना सूचना आहे की, वरील मेसेज पूर्णपणे वाचून आपापल्या विभागातील सर्वांपर्यंत पोहोचवावा. या व्हाईस कॉलला प्रतिसाद देऊन त्यांच्या सिस्टमला जॉईन होऊ नये असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आले आहे.
खरी शिवसेना कुणाची यावरून वाद?
खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावावर दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाकडून चिन्हासह शिवसेना नाव तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. त्यात प्रत्येक गट त्यांच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्रे तसेच अन्य मार्गाचा अवलंब करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"