खासगी कंपनीकडून एसटी महामंडळाची फसवणूक; आसनांवरील स्क्रीनसह इंटरनेट यंत्रणेतही बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:53 AM2018-04-19T03:53:16+5:302018-04-19T03:53:16+5:30
वातानुकूलित शिवशाहीवरील स्थानक नामफलक मराठीत डिजिटल स्वरूपात असावेत, असा करार एसटी महामंडळाने खासगी कंपनीसोबत केला होता. मात्र या कराराची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही.
मुंबई : वातानुकूलित शिवशाहीवरील स्थानक नामफलक मराठीत डिजिटल स्वरूपात असावेत, असा करार एसटी महामंडळाने खासगी कंपनीसोबत केला होता. मात्र या कराराची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर शिवशाहीमधील आसनांमागे असलेल्या स्क्रीन आणि बसेसमधील इंटरनेट सुविधेतही बिघाड असल्यामुळे शिवशाहीच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महामंडळाच्या ताफ्यात एकूण दोन हजार वातानुकूलित शिवशाही दाखल होणार असून मार्च २०१९ पर्यंत त्या राज्याच्या विविध मार्गांवर धावणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यांतर्गत १ हजार १६० वातानुकूलित (बैठ्या) शिवशाही एप्रिल २०१८ पर्यंत दाखल होणार आहेत. यापैकी ६६४ शिवशाही राज्यभर धावत आहेत. मात्र यापैकी काही शिवशाही बसमध्ये मराठी डिजिटल नामफलक नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर शिवशाहीमधील इंटरनेट सुविधा आणि आसनांमागील स्क्रीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे खासगी कंपनीने महामंडळाची फसवणूक केल्याचे पाहायला मिळत आहेत. ऐन सुट्टीत प्रवासी गारेगार व मनोरंजनपर प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी शिवशाहीला पसंती देत आहेत. मात्र शिवशाहीमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी शिवशाही सुरू आहे. शिवशाही ही माझी संकल्पना असून ती यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. येथील मराठी डिजिटल नामफलक मी स्वत: पाहिले आहेत. स्क्रीन आणि इंटरनेटमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवू शकतो. अद्याप सर्व बस ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. महामंडळातील वातानुकूलित शिवशाहीच्या देखभाल-दुरुस्ती आणि फेऱ्यांच्या नियोजनासाठी स्वतंत्र महाव्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष