मुंबई, पुण्यातील खरेदीदारांना घरांचे स्वप्न दाखवून फसवणूक
By admin | Published: July 14, 2017 03:30 AM2017-07-14T03:30:06+5:302017-07-14T03:30:06+5:30
कोकणातील गावात शक्य असल्यास समुद्रकिनारी दोन-चार गुंठे जमीन असावी
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोकणातील गावात शक्य असल्यास समुद्रकिनारी दोन-चार गुंठे जमीन असावी, त्यात एक छोटेसे पण टुमदार घर असावे, पाच-दहा आंब्यांची कलमे असावीत असे स्वप्न मुंबई-पुण्यातील मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय नोकरदारांचे असते. नेमक्या त्यांच्या याच स्वप्नाचा गैरफायदा घेऊन जमिनीकरिता आगाऊ पैसे घेऊन मुळात त्यांच्या नावे जमीनच करून न देणे किंवा जमिनीचे पैसे घेऊन तिसऱ्याचीच जमीन बनावट खरेदीखते करून त्यांच्या नावे करून देण्याची कार्यपद्धती ठेवून जमीन खरेदी-विक्रीचे बनावट व्यवहार करणाऱ्या जमीन दलालांचे पेवच फुटल्याचे गेल्या दहा ते पंधरा वर्षांत रायगड जिल्ह्यात दिसून येत असून अशा बनावट जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. महाड व पोलादपूर तालुक्यांत अशा प्रकारचे २५ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली आहे.
कोकणातील अनेक जण नोकरीच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी त्यांच्या मूळगावी आहेत. त्यातील अनेक जमिनी पडीक आहेत. अशा जमिनींवर प्रत्यक्ष कुणीही राहात नाही. अशा जमिनी शोधून, त्यांचे सातबारा उतारे काढून, त्या उताऱ्यांआधारे त्या जमिनी इच्छुक खरेदीदारास दाखविल्या जातात. त्या जमिनीच्या खरेदीकरिता बयाणा रक्कम, साठेखत करणे, खरेदीखत करणे आदि कारणास्तव इच्छुक खरेदीदारांचा विश्वास संपादन करुन आगावू पैसे घेणे, ती जमीन बनावट खरेदी खताने इच्छुक खरेदीदाराच्या नावावरही करुन देणे आणि कालांतराने त्या जमिनीचा मूळ मालक, आपल्याच जमिनीबाबत काही करण्याकरिता आपल्या मूळ गावी आल्यावर त्यांच्या जमिनी बेकायदा विक्री झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. मग जमीन परत मिळवण्याकरिता न्यायालयात दावा दाखल करुन त्याला आपली जमीन परत मिळवावी लागते. ती परत मिळाली तर मूळ मालक नि:श्वास टाकतो पण ती खरेदी केलेला फसतो असा हा प्रकार असल्याचे महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने तसेच एका वकिलाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
महाडमधील चांभारखिंड गावातील जमीन नावावर करुन देतो अशी बतावणी करुन सहा जणांनी १० मार्च २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत जमीन खरेदी इच्छुकाकडून वेळोवेळी एकूण ३३ लाख रुपये घेवून त्यांना जमिनीचे खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि. आर. पी. शिंदे हे करीत आहेत.
>महाडमध्ये १४ जणांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे
महाड तालुक्यातील कोतुर्डे गावातील चौघांनी आपल्या मूळ मालकीची जमीन एकाला विकलेली असताना तसेच त्यानंतर त्यामधील वादाच्या मुद्यांवरुन त्या जमीन विक्री व्यवहार प्रकरणी न्यायालयात फौजदारी प्रकरण दाखल झाले. त्याच्या सुनावणीअंती न्यायालयाने ती जमिनीस जप्ती आदेश देवून, जमिनीचा विक्र ी व्यवहार व ताबा हस्तांतरणास न्यायालयाने मनाई हुकूम लागू केला.
अशा परिस्थितीत तीच जमीन अन्य १४ जणांनी आपसांत संगनमत करून १५ जून २०१४ रोजी बनावट खरेदी खत करुन १४ जणांपैकी एकाची जमीन मालक म्हणून नोंद करुन घेवून फसवणूक केली. या बेकायदा जमीन खरेदी-विक्री प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वरील गुन्ह्यातील कार्यपद्धतीप्रमाणेच त्याच १४ आरोपींनी कोतुर्डे गावातील अन्य एक जमीन, न्यायालयाचा जप्ती आदेशासह जमिनीच्या विक्र ी व्यवहार व ताबा हस्तांतरण मनाई हुकूम असताना आपसांत संगनमत करून ११ जुलै २०११ रोजी बनावट खरेदी खत नोंदवून १४ पैकी दोघा आरोपींची नावे जमीन मालक म्हणून नोंदवून फसवणूक केली. या प्रकरणी त्याच चौदा आरोपींविरुद्ध महाड पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला असून या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी पो.स.ई. एस.बी.जाधव हे पुढील तपास करीत आहेत.