हायवेलगत पुन्हा ‘चीअर्स’!
By admin | Published: April 15, 2017 05:20 AM2017-04-15T05:20:48+5:302017-04-15T05:20:48+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बंद पडलेले मुंबईतील पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व बीअर बार, दारूची दुकाने खुली होण्याचा मार्ग आता
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे बंद पडलेले मुंबईतील पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील सर्व बीअर बार, दारूची दुकाने खुली होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या दोन्ही मार्गांचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) करण्यात आले आहे.
हे दोन्ही मार्ग एक्स्प्रेस-वे या वर्गामध्ये मोडतात. तांत्रिकदृष्ट्या एक्स्प्रेस-वेंना राष्ट्रीय महामार्ग वा त्यापेक्षाही वरचा दर्जा असतो. त्यामुळे राष्ट्रीय वा राज्य महामार्गांवर ५०० मीटरच्या आतील बीअर बार/दारू दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे दोन्ही मार्गांवरील दारूविक्रीच बंद झाली होती. त्यात लहानमोठ्या दुकानांपासून पंचतारांकित हॉटेल्स आणि क्लबचा समावेश होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने काल एक आदेश काढून हे दोन्ही मार्ग पाच वर्षांसाठी एमएमआरडीएच्या स्वाधीन केल्याने त्यावरील दारूविक्री आता खुली झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा राज्यातील उत्पादन शुल्कापासूनच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. राज्याच्या तिजोरीला सात हजार कोटी रुपयांचा फटका बसेल, असा अंदाज आहे. या निकालाच्या फटक्यातून वाचण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे हस्तांतरण स्थानिक संस्थांना करण्याचा मार्ग शोधला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने पहिल्यांदा दिले होते. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत सर्वत्र दारूची विक्री
पूर्व द्रुतगती मार्गावरील सायन ते मुलुंड आणि सायन ते नवी मुंबई तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे ते दहिसर तसेच सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड यावरील ५०० मीटरच्या आतील बंद दारू दुकाने, बीअर बार खुले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचाच अर्थ मुंबईपासून ठाणे व नवी मुंबईपर्यंत जाताना सर्वत्र दारू मिळेल.