चेंबूरमध्ये रिक्षावर झाड कोसळले, चालक सुखरूप
By admin | Published: June 27, 2016 01:48 AM2016-06-27T01:48:51+5:302016-06-27T01:48:51+5:30
दुपारचे जेवण करण्यासाठी रिक्षा उभी करून खाली उतरत असतानाच रिक्षावर झाड कोसळल्याची घटना रविवारी चेंबूर येथे घडली.
मुंबई : दुपारचे जेवण करण्यासाठी रिक्षा उभी करून खाली उतरत असतानाच रिक्षावर झाड कोसळल्याची घटना रविवारी चेंबूर येथे घडली. सुदैवाने दुर्घटनेत रिक्षाचालक बचावला असून, रिक्षाचे मात्र नुकसान झाले आहे. घटनेनंतर तीन तासांनी अग्निशमन दलाने हे झाडे रस्त्यावरून हटवत येथील वाहतूक सुरळीत केली.
चेंबूरच्या सांडू उद्यानाजवळ ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. चेंबूरच्या श्रमजीवी नगर येथे राहणारा सूर्यनाथ यादव हा रिक्षाचालक नेहमीप्रमाणे सकाळीच रिक्षावर निघाला होता. दुपारी २ वाजेपर्यंत रिक्षा चालविल्यानंतर जेवणासाठी त्याने सांडू उद्यानाजवळील जॉय रुग्णालयासमोर रिक्षा उभी केली. रिक्षातून खाली उतरून तो पुढे जात असतानाच १५ ते २० वर्षे जुने असलेले झाड अचानक त्याच्या रिक्षावर कोसळले. झाड खूप मोठे असल्याने त्याखाली पूर्ण रिक्षा दबली; शिवाय सांडू मार्ग पूर्णपणे बंद झाला. ही बाब स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हे झाड हटविण्यासाठी तीन तासांचा अवधी लागला. या झाडावरून अनेक केबल आणि इंटरनेटच्या वायर्स गेल्या होत्या. झाड कोसळल्यानंतर या वायर तुटल्याने परिसरातील केबल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)
>मी रिक्षातून उतरून १० पावले पुढे जाताच हे झाड माझ्या रिक्षावर कोसळले. माझे नशीब चांगले म्हणून मी वाचलो. मात्र माझ्या रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
- सूर्यनाथ यादव, रिक्षाचालक
चेंबूरचा हा सांडू मार्ग थेट चेंबूर रेल्वे स्थानक आणि सायन-पनवेल महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रविवार शिवाय पाऊस असल्याने येथे वाहनांची वर्दळ कमी होती.