कोंडिवते गावात रसायनमिश्रित पाणी

By admin | Published: April 8, 2017 03:46 AM2017-04-08T03:46:23+5:302017-04-08T03:46:23+5:30

बौद्धवाडीला शुक्रवारी सकाळी रसायनमिश्रित तांबड्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा नळपाणी पुरवठा योजनेमार्फत झाला.

Chemically flavored water in Kondiva village | कोंडिवते गावात रसायनमिश्रित पाणी

कोंडिवते गावात रसायनमिश्रित पाणी

Next

सिकंदर अनवारे,
दासगाव- महाड शहरालगत असलेल्या कोंडिवते गावातील मोहल्ला आणि बौद्धवाडीला शुक्रवारी सकाळी रसायनमिश्रित तांबड्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा नळपाणी पुरवठा योजनेमार्फत झाला. या रसायनिक मिश्रीत पाण्यामुळे गावात एकच हाहाकार उडाला. औद्योगिक वसाहत कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर पाहणी करण्यात आली असता येथील अनधिकृत भंगारवाल्यांचा उपद्व्याप असल्याचे समोर आले. या अनधिकृत भंगारव्यावसायिक विरोधात आणि निष्काळजी शासकीय यंत्रणा विरोधात कोंडिवते गावात संताप व्यक्त केला जात आहे.
कोंडिवते गावाला महाड औद्योगिक वसाहतीमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. कोंडिवते गावाच्या साठवणटाकीतून ग्रामपंचायत पाणीपुरवठा करते. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर कोंडिवते मोहल्ल्यातील जवळपास २० तर बौद्धवाडीमधील १० नळाला लाल आणि करड्या रंगाचे पाणी आले. रासायनिक दुर्गंधीमुक्त या पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली. नक्की काय झाले हे न समजल्याने ग्रामस्थांनी महाड औद्योगिक वसाहत कार्यालयात धाव घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर वसाहतीचे अभियंता दीपक पाटील आणि लाइनमन अशोक माने यांनी कोंडिवते गावातील या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यावेळी औद्योगिक वसाहतीतील होणारा पाणीपुरवठा शुद्ध असून केवळ मोहल्ला आणि बौद्धवाडीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचे उघड झाले. हा सर्व उपद्व्याप येथील अनधिकृत भंगारवाल्याचा असल्याचे निदर्शनास आले.
कोंडिवते मोहल्ला हद्दीमध्ये करमा हुसैन अब्दुल्ला खान हा प्लास्टिक पिशव्यांचा व्यवसाय करतो. महाड औद्योगिक वसाहत आणि लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधून हा भंगारवाला प्लास्टिक पिशव्या गोळा करतो. कोंडिवते येथील स्वत:च्या मालकीच्या जागेत या केमिकलसाठी वापरण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांची साफ-सफाई करतो. या साफ-सफाईसाठी वापरण्यात आलेले पाणी पुन्हा पाणीपुरवठा योजनेमध्ये परत गेल्याने ही घटना घडल्याचे उघड झाले.
>कारखान्यांवर कारवाईची गरज
औद्यागिक वसाहतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिशव्या, बाटल्या, टाक्या आदी सर्व सामानाची विल्हेवाट योग्य प्रकारे करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारखान्यांना देण्यात आलेले असतात. मात्र, या निर्देशाचे पालन न करता, हाउसकिपिंगच्या नावाने ठेका काढून भंगारवाल्यांच्या गळ्यात हे प्रदूषणकारक साहित्य कारखानदार मारत असतो. त्यातूनच अशा घटना घडत असतात. या प्रकरणी गंभीर दखल घेत येथील पिशव्या त्यावरील कारखान्यांची नावे याचा तपास करून संबंधित कारखानदारांवर कारवाईची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा योग्य आहे. मात्र, वॉल नसलेल्या नळ कनेक्शनचा पाइप केमिकलच्या पाण्यात टाकल्यामुळे हे केमिकलचे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये मिसळले आहे. यामध्ये औद्योगिक वसाहतीचा काही गुन्हा नाही.
- अशोक माने, पाइप लाइनमन, महाड औद्योगिक वसाहत
करम खान हा कोंडिवते गावचा रहिवासी आहे. त्याच्या मालकीच्या जागेत त्यांनी घरगुती वापरासाठी नळ कनेक्शन घेतलेले आहे. येथे सुरू असलेला औद्योगिक वसाहतीतील प्लास्टिक पिशव्यांचा हा व्यवसाय अनधिकृत आहे. या प्रकरणानंतर हा अनधिकृत व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात येणार असून संबंधित नळ कनेक्शन तातडीने तोडणार आहोत. या प्रकरणी खान याच्यावर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल.
- काशीनाथ दिघे,
उपसरपंच, कोंडिवते
अशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नसून थोड्या फार प्रमाणात रंगीत पाणी अगर पाण्याला गाळ, अशा घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या ठिकाणचे केमिकलचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येथील व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड
आता हा भंगार व्यवसाय गावाबाहेर टाका, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित भंगार व्यवसायिकावर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Web Title: Chemically flavored water in Kondiva village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.