लवकरच सर्व केमिस्टमध्ये जेनेरिक बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:34 AM2018-07-09T05:34:39+5:302018-07-09T05:34:54+5:30
गेल्या वर्षभरापासून जेनेरिक औषधांची सक्ती करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो आहे. त्यात आता नव्याने आणखी निर्णय समोर आला आहे.
मुंबई - गेल्या वर्षभरापासून जेनेरिक औषधांची सक्ती करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो आहे. त्यात आता नव्याने आणखी निर्णय समोर आला आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार आता सरसकट सर्वच केमिस्ट्ना जेनेरिक औषधे विकण्याचे बंधनकारक केले आहे. या परिपत्रकानुसार, ग्राहकांच्याही निदर्शनास येईल, अशा पद्धतीने सर्व केमिस्ट्सने दर्शनी भागात जेनेरिक औषधे ठेवण्याची वेगळी व्यवस्था करण्याचे सुचविले आहे.
जेनेरिक औषधांचा प्रसार करण्यासाठी देशभरातील विविध भागांत जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली. रुग्णांना स्वस्तात गुणकारी औषध उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने केंद्र सरकारने जेनेरीक औषधांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या औषध नियंत्रक डॉ.एस.ईश्वरा रेड्डी यांनी सांगितले की, देशभरातील सर्वच औषध दुकानांच्या माध्यमातूनही आता जेनेरीक औषधे उपलब्ध व्हावीत, या हेतूने औषध दुकानांनाही जेनेरिकची सक्ती केली आहे. त्यानुसार, १२ जुन रोजी यासंंबंधीचे एक पत्रच जारी केले असून, त्याद्वारे औषध दुकानदारांना जेनेरिक औषधांसाठी स्वतंत्र जागा वा स्वतंत्र रॅकची सोय दुकानात करण्याचे आदेश दिले आहेत.
आम्हाला द्या अधिकार
केमिस्ट्सना जेनेरिक औषधे बंधनकारक करणे हा निर्णय स्वागतार्ह आहे, पंरतु डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे गरजेचे आहे.
- कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशन