रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 07:52 AM2021-01-23T07:52:34+5:302021-01-23T07:58:07+5:30

‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब.

Chhagan bhujbal about Balasaheb thackeray | रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

रातराणी, इंजेक्शन आणि बाळासाहेब

googlenewsNext

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री -

व्ही.जे.टी.आय.चा विद्यार्थी असताना व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या विचारांकडे ओढला गेलो. हो, तेव्हा ते बाळ ठाकरे होते. ते राजकारणात आले नसते तर जागतिक कीर्तीचे संपादक झाले असते. परदेशी संस्था त्यांच्याकडून व्यंगचित्र घेत. पण, शिवाजी पार्कच्या त्या ऐतिहासिक सभेनंतर ते राजकारणात आले आणि  ‘बाळासाहेब’  बनले. हा मोठा प्रवास प्रत्यक्ष पाहिलेले बहुतेक सहकारी आज हयात नाहीत, काही जण तब्येतीमुळे उपलब्ध नाहीत. अजून गाडी सुरू आहे, असा कदाचित मी एकटाच असेन. या प्रदीर्घ प्रवासात अनेक आठवणी आहेत. अतिशय नीटनेटकेपणा असलेले बाळासाहेब, क्रिकेटचे निस्सीम चाहते बाळासाहेब. आज बाळासाहेब असते तर ऑस्ट्रेलियातील विजयाने त्यांना प्रचंड आनंद झाला असता. ‘आपली पोरं जिंकली’ म्हणून त्यांनी जल्लोषच केला असता. व्यंगचित्रकार असल्याने राजकीय - सामाजिक अभ्यास तर आपसूकच होता. आपल्या मतावर ठाम, एखादा विचार मांडल्यावर त्यावर ठाम-कायम राहणारे नेते म्हणजे बाळासाहेब.'

बाळासाहेबांचे फुलांवर खूप प्रेम होते. अनेकदा कात्री वगैरे घेऊन ते बागकाम करीत असत. चार-पाच महिन्यांतून एकदातरी ते सहकुटुंब आमच्या नाशिकच्या शेतावर आवर्जून येत. फुलांचा बगीचा आणि आयुर्वेदिक वन उभारण्याची इच्छा ते अनेकदा बोलून दाखवत. विविध झाडे आणि फुलांच्या माहितीचा एका खजानाच त्यांच्याकडे होता. नाशिकच्या घरी आम्ही रातराणीचे झाड लावत होतो. फार काही विचार त्यामागे नव्हता, दिसली जागा की लावले, असा आमचा मामला. पण, बाळासाहेबांचे तसे नव्हते. त्यांनी जागा बदलायला लावली. वारा कोणत्या बाजूने वाहतो, मग रातराणीचा सुगंध घरात येईल अशा पद्धतीने ते लावायला हवे, असे सांगत त्यांनी योग्य जागी ते रोप लावायला लावले. त्याचा दरवळ आजही आहे. 

शाखाप्रमुख ते नगरसेवक नंतर आमदार आणि मुंबईचा महापौर म्हणून संघटना उभारणीसाठी मी राज्यभर फिरायचो. एकदा जालन्याला जाहीर सभा होती. तेव्हा नेमके माझ्या पत्नीची तब्येत बिघडली, ऑपरेशन करावे लागणार होते. पण, सभा आधीपासून ठरलेली आणि अनेक लोक त्याकामी गुंतलेले होते. त्यामुळे आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी सभेला गेलो. पण, खुद्द बाळासाहेब आणि माँसाहेब दवाखान्यात माझ्या पत्नीसाठी थांबले होते. संपूर्ण वेळ तिथे त्यांनी व्यवस्था सांभाळली. कुटुंबप्रमुखाचे ते रूप होते.

आजूबाजूला त्यांचे बारीक लक्ष असे. आपल्या विषयांबाबत ते आग्रही होते. उपचारांबद्दलही तसेच होते. त्यांच्याकडे होमिओपॅथीची पेटीच होती. त्यात एकेका आजारासाठी एक - एक कुपीच होती. त्यात ते जाणकारही होते. 

एकदा ते आजारी पडले होते. तेव्हा डाॅक्टर उपचार करीत होते पण सुधारणा नव्हती. साहेब अगदीच कृश दिसू लागले. तेव्हा आम्ही डाॅक्टरांना गाठले. बाळासाहेबांना काही झाले तर सोडणार नाही, अशी तंबीच दिली. तेव्हा उलट डाॅक्टरच म्हणाले, ‘बरे झाले तुम्ही भेटलात. मीपण तुमच्या सारख्यांच्या शोधात होतो. जो बाळासाहेबांना ॲलोपॅथी उपचार घ्यायला भाग पाडेल. ती औषधे-इंजेक्शन घ्यायला लावेल.’ मग, पुढे के.ई.एम.च्या डाॅक्टर दळवींना पुढे करत आम्ही ती जबाबदारी पार पाडली.

मी कंठलंगोट साेडली -
मी मुंबईचा महापौर होतो तेव्हाचा एक प्रसंग आठवतो. ‘सुंदर मुंबई - मराठी मुंबई’, वाहतुकीच्या बेटांचे सुशोभीकरण वगैरे धडाका सुरू होता. अनेकांच्या भेटीगाठी, कार्यक्रम वगैरे असायचे. हळूहळू कोट-टाय असा वेश बनला. एकदा अशाच वेशात बाळासाहेबांसमोर गेलो.
मला पाहून ते म्हणाले, ‘काय हो, भुजबळ; तुमच्या सुंदर मराठी मुंबईत ती कंठलंगोट कशी काय शोभेल?’ त्यांच्या या वाक्याने काय समजायचे ते उमजून गेलो. त्यानंतर कधीच कंठलंगोट चढवली नाही. 

Web Title: Chhagan bhujbal about Balasaheb thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.