छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली; एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:28 AM2023-12-18T10:28:45+5:302023-12-18T10:30:00+5:30
मराठा-ओबीसी आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगे पाटील सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत.
मुंबई - मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे पाटील आग्रही मागणी करतायेत तर दुसरीकडे मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या ओबीसीमधून नको अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ मांडत आहे. त्यात मागील २ महिन्यापासून राज्यात भुजबळ-जरांगे यांचे शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात आता दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक हल्लाबोल केला आहे. बेवड्या, पिऊन पिऊन किडन्या किडल्या अशी बोचरी टीका भुजबळांनी जरांगेंवर केली तर भुजबळ हे मुर्खाचा मुकादम आहे असा पलटवार जरांगेंनी भुजबळांवर केला.
भिवंडी येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे आमची लायकी काढतात. काहीही बोलतो, मला येवल्याचा येडपाट म्हटलं. एक म्हण आहे 'आधीच मर्कट तशातच मद्य प्याला' आधीच माकड त्यात बेवडा प्यायला, काहीही बोलतो. अरे आमची लायकी तू काय काढतोस, काय तुझी हिंमत, काय बघणार आहे मला? तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ. मला मारण्याच्या धमक्या, उघडपणे दादागिरी करतोय. हे अजिबात सहन केले जाणार नाही असं त्यांनी म्हटलं.
त्यावर हा आधीच जातीवादी आणि तो मुर्खाचा मुकादमच आहे. महामुर्ख माणूस असल्याने त्याला येडपाट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मल्यापासून दारूचा डाग नाही. हे शरीर जनतेसाठी लढून असं झालंय. तुझ्यासारखं लोकांचे रक्त पिऊन शरीर वाढले नाही.माकड काय करू शकतो हे रावणाला विचार, तुझीही लंका जळेल, नीट राहा असा पलटवार मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्याचा भुजबळांना टोला
छगन भुजबळ हे जे काही ओबीसी समाजाची बाजू घेतायेत त्यातला खरा ढोंगीपणा हा बाहेर येईल. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. परंतु यात भुजबळांना फारसा दोष नाही. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने भुजबळांना बोलावून घेतले आणि सांगितले, तुम्ही जामिनावर आहात. त्यामुळे अजून आक्रमक व्हा. त्यामुळे भुजबळांना आक्रमक व्हावे लागतंय असा टोला ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी लगावला आहे.