मराठा-OBC वादावरून छगन भुजबळ अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:23 AM2023-12-13T11:23:17+5:302023-12-13T11:25:08+5:30
तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
नागपूर - मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मंगळवारपासून चर्चा सुरू आहे. त्यात अनेक नेत्यांनी आपापली मते मांडली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. भुजबळ जाहीर सभेतून करत असलेल्या भाषणावर चव्हाण यांनी टीका केली. त्याला भुजबळांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्यात जो काही निर्णय होतो त्याला सामुहिक मंत्रिमंडळ जबाबदार आहे. जो निर्णय घ्यायचा तो मंत्रिमंडळात घ्या ना..जे काही मतभेद असतील पण बाहेर जाऊन समाजात तेढ निर्माण होईल असे आवेशपूर्ण भाषण केले जाते.मंत्रिमंडळात चर्चा करा. पण समाजासमाजात भांडणे लावायची ही तुमची राजकीय खेळी आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
त्यावर तुम्ही चांगले बोलता, नाव घेतले असते तरी बिघडले नसते. अख्खं बीड पेटल्यानंतर, या सभागृहातील २-२ सदस्यांची घरे पेटल्यानंतर, बायका-मुले अडकल्यानंतर, राखरांगोळी झाल्यानंतर तुमचे-आमचे काम होते, तिथे बघायला जाणे. हे दृश्य पाहिल्यानंतर मी स्वत:ला रोखू शकलो नाही. हे काय सुरू आहे. २ महिने सातत्याने हे सुरू होते. मी काहीच बोललो नाही. जे चूक ते चूक आहे हे सांगणे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? जीवघेणे प्रकार थांबवले पाहिजे हे सांगणे काम नाही का? बाहेर जाऊन चुकीचे घडत असेल. एका समाजाविषयी कुणी बोलत असेल तर दुसरा समाजही आहे त्याचेही काही म्हणणं आहे. मी फक्त बाहेर नाही तर मंत्रिमंडळातही बोललो आहे. मला सातत्याने शिवीगाळ होत असेल तर मी एकदा नव्हे तर १०० वेळा बोलणार असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिले.
दरम्यान, जरांगे पाटील काही चुकीचे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करू शकता.पण आपण या मंत्रिमंडळाचे सदस्य आहात. जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा काही जबाबदारी असते. तुम्हाला बोलायचे असेल तर आवश्य बोला. परंतु पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून टाका. मंत्रिमंडळातून बाहेर जाऊन वाटेल ते बोला. हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री समर्थ आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा. राज्यात तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.