छगन भुजबळ यांना अटक

By admin | Published: March 15, 2016 04:43 AM2016-03-15T04:43:34+5:302016-03-15T04:43:34+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मनी लाँडरिंगच्या आरोपावरून सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री १० वाजता अटक केली.

Chhagan Bhujbal arrested | छगन भुजबळ यांना अटक

छगन भुजबळ यांना अटक

Next

- डिप्पी वांकाणी, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मनी लाँडरिंगच्या आरोपावरून सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री १० वाजता अटक केली. ते उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती देऊ न शकल्याने आणि चौकशीमध्ये सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री सांगितले. भुजबळ यांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असून, त्या वेळी ईडीतर्फे त्यांची कोठडी मागण्यात येईल. त्यामुळे भुजबळ यांना लगेच जामीन मिळेल का, हे सांगणे अवघड आहे.
भुजबळ यांची सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १0 वाजेपर्यंत, तब्बल ११ तास त्यांची कसून चौकशी सुरू होती. त्यानंतर ईडीच्या कार्यालयात त्यांना अटक करण्यात आली. रात्रभर त्यांना ईडीच्या कार्यालयातील कोठडीतच ठेवण्यात येणार आहे. अटकेच्या काही मिनिटे आधी राज्य राखीव दलाच्या जवानांना तिथे बोलावण्यात आले. तेव्हाच भुजबळ यांची अटक अटळ असल्याचे जाणवू लागले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच त्या भागातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिथे मोठ्या संख्येने जमतील, या शक्यतेने पाण्याचे फवारे मारणारे वाहनही तिथे आणण्यात आले. त्या परिसरात सकाळपासूनच जमावबंदी लागू करण्यात आली होती.
भुजबळ यांच्या पुतण्या समीर याला १२ फेब्रुवारी रोजीच ईडीने अटक केली असून, त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे भुजबळ यांना कोठडीत राहावे लागेल की नाही, हे आताच सांगणे अवघड आहे, असे ईडीचा अधिकारी म्हणाला. भुजबळ यांचा मुलगा आ. पंकज यांना पासपोर्ट ईडीने ताब्यात घेतला आहे.
भुजबळ यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते तसेच महात्मा फुले समता परिषदेचे नेते यांची बैठक विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत ती सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी सकाळी होणार असून, त्या बैठकीत भुजबळ यांच्या अटकेबाबत सभागृहात काय भूमिका घ्यायची आणि रस्त्यावर आंदोलन करायचे का, याबाबत निर्णय घेला जाणार आहे.
आमचे नेते भुजबळ चौकशीला पूर्ण सहकार्य करीत असताना आवश्यक ती कागदपत्रे सादर करीत असताना त्यांना अशी अटक करणे हे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी रात्री उशिरा केला. भुजबळांच्या अटकेबाबत पक्षाची भूमिका मंगळवारी सकाळी ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता भुजबळ बँक खात्यांशी आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांसह वकिलासोबत आले होते. तिथे त्यांचे २०० समर्थक त्यांच्या समर्थनाच्या घोषणा देत होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. त्या भागात पोलिसांनी जमावबंदी लागू केली होती. भुजबळ पांढऱ्या टोयोटा कॅमरी (एमएच -१५-ईएक्स १०६९) कारने आले. या कारची नोंदणी मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नावावर आहे. भुजबळांसोबत ईडीच्या कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल नार्वेकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यामागे ठामपणे उभे आहेत, असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

- भुजबळ यांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम कुठून आली असे ईडीतर्फे विचारण्यात आले. मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये हा पैसा गुंतविण्यात आला, असा आरोप आहे. रोख रक्कम रुग्णवाहिकांमध्ये ठेवण्यात आली होती. नंतर ती मटक्याच्या धंद्यातील हवाला आॅपरेटरकडे नेण्यात आली, कोलकात्याच्या कंपन्या आणि हवाला व्यवहार करणाऱ्याने आपापली भूमिका मान्य केल्यानंतरही हा पैसा कुठून आला हे समीर व पंकज सांगू शकलेले नाहीत. हा पैसा आला कुठून हे शोधून काढण्यासाठी आम्ही चौकशी करीत आहोत, असे सूत्रांनी म्हटले.

- भुजबळ यांनी हवाला आॅपरेटरला यात ओढले का आणि ज्या बनावट कंपन्यांनी धनादेश दिले त्यांच्याशी या आॅपरेटरने मध्यस्थी केली का याची आम्ही खातरजमा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर आणि पंकज यांना असे व्यवहार मार्गदर्शनाशिवाय व भुजबळ यांच्याकडील पैशांशिवाय करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर आणि पंकज यांच्या कोणत्याही कंपन्यांमध्ये भुजबळ संचालक नव्हते. महाराष्ट्र सदन आणि कालिना सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी छगन भुजबळ यांनी कंत्राटदाराकडून लाच म्हणून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे.

भुजबळ कुटुंबावर झालेली कारवाई
१२ डिसें.२०१५ ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी
२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती
१ फेब्रु.२०१६ : छगन भुजबळ अमेरिकेला रवाना. भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर ईडीचे छापे. समीर भुजबळची ईडीकडून दिवसभर चौकशी. समीर यांना रात्री उशिरा अटक.
२ फेब्रुवारी : भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने - शरद पवार
२४ फेब्रु. : भुजबळांवर आरोपपत्र दाखल
८ मार्च : ईडीचे छगन भुजबळ यांना समन्स, १४ मार्चला हजर राहण्याची सूचना

राजकीय सूड घेतला जातोय
मुंबईतील ईडीच्या कार्यालयात भुजबळ सकाळी ११ वाजता पोहोचले. कार्यालयात प्रवेश करण्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘‘माझा राजकीय सूड घेतला जात असून, मी त्याचा बळी ठरलो,’’ असे सांगितले. ‘‘चौकशी करणाऱ्या यंत्रणेला मी सहकार्य करीन,’’ असेही ते म्हणाले.

हे तर राजकीय षड्यंत्र
आमचे नेते छगन भुजबळ चौकशीला पूर्ण सहकार्य करत असताना त्यांना अटक करणे, हे राजकीय षड्यंत्र आह. ईडीने चौकशीअंती न्यायालयात चार्जशीट दाखल करून भुजबळ दोषी आहेत की कसे, हे न्यायालयाला ठरवू द्यायला हवे होते. परंतु तसे न करता ज्यांनी चौकशी केली त्यांनीच त्यांना अटक केली. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तीची अशा प्रकारे मानहानी केली जाणे उचित नाही. भुजबळ हे बहुजन समाजातील मान्यवर नेते असून, सरकारच्या या कारवाईमुळे त्यांचे असंख्य समर्थक दुखावले जाणार आहेत. आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभा आहे.- जयंत पाटील, राष्ट्रवादी

राजकीय रंग देऊ नये
भुजबळांच्या अटकेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्यानेच ईडीने त्यांना अटक केली असावी. आम्ही विरोधी पक्षात असतानाच भुजबळ यांच्याविरोधात तक्रार केली होती. - माधव भंडारी,
भाजपाचे प्रवक्ते

अतिशय आनंद झाला : भुजबळांना अटक झाल्यामुळे अतिशय आनंद झाला. ४ वर्षे ज्यासाठी झटत होतो, त्याचे सार्थक झाले. या प्रकरणात लढा देण्यास एका वकिलानेही असमर्थता दर्शविली होती. तिथे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा लढा यशस्वी झाला. यामुळे हे सिद्ध झाले की शक्तीच नेहमी सर्वश्रेष्ठ नसते. - अंजली दमानिया
 

Web Title: Chhagan Bhujbal arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.