Maharashtra Budget: "पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे..."; छगन भुजबळांची सरकारवर खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 09:26 PM2023-03-13T21:26:48+5:302023-03-13T21:28:02+5:30
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी
Chhagan Bhujbal, Maharashtra Budget 2023: राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडून सर्वांना खूश करत आकड्यांचा खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यातुन राज्यकर्ते म्हणुन सरकारच्या झोळीत काहीतरी पडेन पण राज्याच्या जनतेच्या झोळीत काहीच पडणार नाही. अर्थसंकल्पाचे वर्णन ‘पंचामृत’ असे केले. पूजा झाल्यावर श्रद्धावान मंडळी प्रसादाच्या जोडीला पळीभर पंचामृत तीर्थ म्हणून देतात. त्याने पोट भरत नाही. तसाच हा अर्थसंकल्प म्हणजे सर्व घटकांना सामावून घेण्याचा फक्तच प्रयत्न होतोय, मात्र त्याने राज्याचे पोट भरणार नाही, अशी टीका करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली ३०० रुपये आर्थिक मदत ही अतिशय तुटपुंजी असून शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान देण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून अर्थ संकल्पावरील चर्चेवर बोलताना सभागृहात व्यक्त केली.
अर्थ संकल्पावरील चर्चेवर ते म्हणाले की, अर्थसंकल्पामध्ये महसुली जमेत अधिक वाढ दाखविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात जमीन महसुलाचा २०२२-२३ सुधारित अंदाज ३ हजार कोटी असताना अर्थसंकल्पीय अंदाज मात्र ४ हजार ५०० कोटी दाखविण्यात आला. अचानक १ हजार ५०० कोटींची वाढ कशी झाली.राज्य वस्तू व सेवाकर २०२२-२३ सुधारित अंदाज १,२५,४११ कोटी असताना अर्थसंकल्पात मात्र १,३६,०४१ कोटी अचानक ११ हजार कोटीची वाढ कशी झाली. व्याज्याच्या जमा रक्कमा २०२२-२३ सुधारित अंदाज १४०० कोटी असताना आता अचानक ३ हजार कोटी कसे झाले. सीमा शुल्क १५९४ कोटी असताना अचानक २०४६ कोटी कसे झाले असे सवाल उपस्थित करत
विकासावर करण्यात येणारा खर्च हा महागाईच्या दरानुसार दिवसागणीक वाढत जातो. तुमचा मात्र खर्च हा कमी झाल्याचा दिसतो अशी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, महागाई दर ७ टक्के आहे. तरी देखील Fiscal Defecate कमी दाखविण्यासाठी खर्च कमी दाखविण्यात आला. खर्चाचे आकडे कमी दाखविले आणि जमेचे आकडे फुगविले गेले असा घणाघात त्यांनी केला. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा २०२२-२३ चा सुधारित अंदाज हा २२४४९ कोटी एवढा असताना यावर्षी मात्र मक्त २१८४७ कोटी खर्च केला जात आहे. आरोग्यावर खर्च वाढवण्याऐवजी तो कमी का केला ? राज्य सरकार आपला दवाखाना कोणत्या पैशातून सुरु करणार जाहिरातींवरचा म्हणजेच माहिती व प्रसारण विभागाचा खर्च मात्र तुम्ही वाढविला २०२२-२३ मध्ये २८० कोटी असताना आता मात्र ६०० कोटी केला असा सवाल उपस्थित करत आकडेवारीचा निव्वळ खेळ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.