जो आधीपासून दिशाहीन, तो दिशा काय दाखवणार?; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:53 AM2024-02-25T11:53:47+5:302024-02-25T12:07:33+5:30
काही काळासाठी तुम्ही वादळ उठवू शकता, पण त्यातील सत्यता बाहेर आल्यानंतर ते वादळ तितक्याच वेगाने संपते असं त्यांनी सांगितले.
नाशिक - Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil ( Marathi News ) जो पहिल्यापासून दिशाहीन आहे तो पुढची दिशा काय ठरवणार?, वारंवार मागण्या वाढवल्या जातात, त्याला न समजणारे विषय, न समजणारा अध्यादेश, त्याचा अर्थ, वेळोवेळी उधळलेला गुलाल हे पाहता सुरुवातीला निजामकाळातील कुणबी नोंदी, आधी मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्रे द्या, मग महाराष्ट्रातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे द्या. मग ते वाढत वाढत गेले. त्यामुळे लोकसुद्धा आता म्हणतायेत, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलंय मग आंदोलनाची गरज काय? असा सवाल मंत्री छगन भुजबळांनी विचारला.
छगन भुजबळांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की, रोज उठलं की आंदोलन, आंदोलन..शेवटी जे आंदोलन करतात त्यांनाही रोज घरचे काम, पोटपाणी असतं की नाही. त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील. आता त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक बोलू लागलेत. लोकांच्या लक्षात आलेले आहे. या गृहस्थाचा अभ्यास नाही. उगीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कुणाला शिव्या द्यायच्या, संत तुकाराम यांच्याबाबतीत चुकीचे बोलणे. मुख्यमंत्र्यांसह सर्वांना वाईट बोलणे या सर्व गोष्टी लोकांच्या लक्षात येतायेत. शेवटी महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. काही काळासाठी तुम्ही वादळ उठवू शकता, पण त्यातील सत्यता बाहेर आल्यानंतर ते वादळ तितक्याच वेगाने संपते असं त्यांनी सांगितले.
जाहिरातबाजीतून चिन्ह पोहचवण्याचा प्रयत्न
निवडणुकीत तुतारी किती वाजेल याबाबत मी सांगू शकत नाही. या वयात आणि इतक्या शारिरीक अडचणी असताना शरद पवार रायगडावर गेले हे कौतुकास्पद आहे. नवीन चिन्ह मिळते, तेव्हा अशाप्रकारे समारंभ केला जातो. जेणेकरून त्याचा प्रचार, प्रसार होईल. माध्यमांमध्ये ते दाखवले, त्यातून जाहिरातबाजी झाली असा टोला मंत्री छगन भुजबळांनी शरद पवार गटाला लगावला.