“१०-१२ टक्के मर्यादा वाढवा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या”: छगन भुजबळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:16 PM2023-11-09T19:16:42+5:302023-11-09T19:18:32+5:30

Chhagan Bhujbal News: आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

chhagan bhujbal demand increase 10 to 12 percent limit and give reservation to maratha community | “१०-१२ टक्के मर्यादा वाढवा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या”: छगन भुजबळ यांची मागणी

“१०-१२ टक्के मर्यादा वाढवा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या”: छगन भुजबळ यांची मागणी

Chhagan Bhujbal News: आताच्या घडीला राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच बिहार विधानसभेत ७५ टक्के आरक्षण विधेयक बिनविरोध मंजूर करण्यात आले आहे. यासंदर्भात आता राज्यातही आरक्षण मर्यादा वाढवण्याबाबत चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. 

मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ५० टक्के आरक्षण आधीच दिले आहे. यात केंद्र सरकारने १० टक्के आरक्षण EWS यांना दिले आहे. यातच आता आणखी १० ते १२ टक्के आरक्षण वाढावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. ही आमची मागणी आहे, असे म्हटले आहे. तसेच मराठा समाज यापूर्वी ओबीसी होता, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. यावर प्रश्न विचारला असता, ते खूप काय काय बोलतात, पण त्या सगळ्यावर बोलायला मी मोकळा नाही, अशी खोचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. 

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून नाराजी

याआधीही छगन भुजबळ यांनी काही मुद्द्यांवर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नसून ओबीसीमधून सरसकट देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण देऊन ओबीसींवरती अन्याय होत असल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच मराठा समाज गरीब आहे, मात्र आरक्षण हे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, राज्यभरात सुरू केलेल्या कार्यालयात या आणि कुणबी प्रमाणपत्र घेऊन जा, हे जे चाललेले आहे, ते चुकीचे आहे. खरोखर जे कुणबी आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. पण जे चुकीच्या मार्गाने घुसत आहेत, त्यांना आमचा विरोध आहे. त्यांनी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. कुणबी प्रमाणपत्र मिळाले तरी ओबीसीमध्ये दाखल होऊ शकत नाही, हा संभ्रम कसा तो आधी दूर करावा, ते आधी सांगावे, मग प्रश्न मिटेल, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. 

 

Web Title: chhagan bhujbal demand increase 10 to 12 percent limit and give reservation to maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.