CAA : जन्माचा दाखला मी सुद्धा देऊ शकत नाही : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:24 PM2020-02-29T14:24:22+5:302020-02-29T14:25:46+5:30
आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा अधिक हिंदुना नागरिकत्व सिद्द करता आले नाही.
मुंबई : दिल्लीत नागरिकत्व कायद्यावरून समर्थक आणि विरोधक समोरासमोर भिडल्याने मोठ्याप्रमाणावर हिंसाचार घडला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशभरात अजूनही अनेक ठिकाणी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहेत. यावरूनच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मलासुद्धा जन्माचा पुरावा देणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भुजबळ म्हणाले की, आसाममध्ये मुस्लिमांपेक्षा अधिक हिंदुना नागरिकत्व सिद्द करता आले नाही. मला जर विचारलं की तुमच्या आई-वडीलांचा जन्म दाखला दाखवा, तर ते मी देऊ शकत नाही. तसेच माझ्याकडे सुद्धा खरा जन्म दाखला नसून, घरच्यांनी जबरदस्तीने शाळेत टाकले आणि तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी माझी जन्म तारीख स्वता:चा मनानी टाकून दिली. त्याच्यापलीकडे काहीच नसल्याचं ते म्हणाले.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीएए बाबत बोलले असतील, पण त्यांनी एनआरसीला पाठींबा दिला नाही. तसेच राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या पक्षाचं मात्र या तिन्ही गोष्टीला विरोध आहे. अधिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोकं भटकंती करत असतात. त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्रे कुठून येणार. तर हिंदूंना या कायद्यामुळे सर्वात जास्त त्रास होणार असल्याचे सुद्धा भुजबळ म्हणाले.