छगन भुजबळांना 2 दिवसांची कोठडी

By Admin | Published: March 15, 2016 04:26 PM2016-03-15T16:26:25+5:302016-03-15T18:14:39+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 2 दिवसांची सक्तवसुली संचनलनालयाची (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे

Chhagan Bhujbal gets 2-day custody | छगन भुजबळांना 2 दिवसांची कोठडी

छगन भुजबळांना 2 दिवसांची कोठडी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १५ -  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना 2 दिवसांची सक्तवसुली संचनलनालयाची (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयात मंगळवारी हजर केलं असता भुजबळांना कोठडी सुनावण्यात आली. सक्तवसुली संचनलनालयाने न्यायालयात भुजबळांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयात हजर करण्याअगोदर सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
 
छगन भुजबळ यांचे आर्थिक व्यवहारातील दस्तावेज असामाधानकारक असल्याचं तसंच मंत्री असल्याचा गैरफायदा घेत भुजबळांनी सगळा पैसा जमा केल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी न्यायालयात केला. भुजबळ चौकशीत सहकार्य करत नसल्याचंही वकिलांनी यावेळी सांगितलं. तसंच छगन भुजबळांच्या उत्पन्न स्त्रोतावर संशय असल्याचा आणि  भुजबळांच्या कंपन्यांतील संचालक बनावट असल्याचही वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितलं आहे. 
 
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली होती. सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून त्यांना अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.
 
दरम्यान, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. भुजबळ यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक बनले असून राज्यात ठिकठिकाणी रास्तोरोको करून निदर्शने करण्यात येत आहेत. नाशिकमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत, भुजबळ समर्थकांनी येवला येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. तर मनमाडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव-पाटणे गावाजवळ समर्थकांनी रास्तारोको करत वाहतूक अडवून ठेवली आहे. तसेच ओझर येथेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मुंबई हायवे रोखून ठेवल्याने धुळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प  झाली आहे.
 
 
छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात आली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी भुजबळ यांची पाठराखण करत पक्ष संपूर्णपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे नमूद केले. भुजबळांसाठी पक्ष कायदेशीर लढाईदेखील लढेल असेही त्यांनी सांगितले. 

विधानसभेतही विरोधकांनी भुजबळांच्या अटकेप्रकरणी गोंधळ घालत निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी भुजबळांचं चौकशीला सहकार्य असताना मग अटक का ? असा सवाल विचारत भुजबळांची अटक पुर्वनियोजीत असल्याचा आरोप केला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. भुजबळांच्या अटकेशी राज्य सरकारचा काही संबंध नाही. ईडीने पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 


 
 

 

Web Title: Chhagan Bhujbal gets 2-day custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.