गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:53 AM2023-12-10T09:53:49+5:302023-12-10T09:57:44+5:30

इंदापुरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतरच गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली होती.

Chhagan Bhujbal got angry after attack on Gopichand Padalkar over maratha reservation | गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

मुंबई : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यानंतरच घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. या घटनेबाबत छगन भुजबळ यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट लिहीत तीव्र निषेध केला असून आक्रमक इशाराही दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेकीच्या घटनेचा निषेध करताना छगन भुजबळ यांनी लिहिलं आहे की, "आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला. आज विधानपरिषद सदस्य गोपीचंदजी पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली. या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपला संताप व्यक्त केला. तसंच मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितलं आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही भुजबळांनी दिला आहे.

इंदापुरात नेमकं काय घडलं?

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. या मागणीला विरोध करत ओबीसी नेते सध्या राज्याच्या विविध ठिकाणी एल्गार सभा घेत आहेत. भुजबळ यांच्या उपस्थितीत काल राज्यातील तिसरी ओबीसी एल्गार सभा इंदापूर येथे झाली. या सभेत ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मेळाव्यातून जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध दर्शवला.  हा मेळावा संपताच गोपीचंद पडळकर हे इंदापुरात सुरू असलेल्या आणखी एका आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र त्याचवेळी पडळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली आणि त्यांच्यावर चप्पलफेकीचा प्रकारही घडला.

ठाकरे गटाचे दावे खा. शेवाळेंनी फेटाळले; अपात्रता सुनावणीत उलटतपासणी

ओबीसी मेळाव्यात काय म्हणाले पडळकर?

मराठ्यांच्या ओबीसीकरणाच्या मागणीला विरोध करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, "ओबीसी समाजाच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याला आडवा करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. सध्या सरसकट कुणबी दाखले देणे सुरू केलं आहे. बहुजन जातीच्या लोकांना कितीही हेलपाटे घातले तरी आम्हाला पुरावे मागत आहेत आणि इकडे कुणबी प्रमाणपत्रे देण्याचं काम सुरू आहे. भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस कोणी वाकडा करु शकत नाही," अशा शब्दांत पडळकरांनी आपली भूमिका मांडली होती.
 

Web Title: Chhagan Bhujbal got angry after attack on Gopichand Padalkar over maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.