छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, "त्यांचा अभ्यास कमी, उगीच काही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 01:39 PM2024-06-24T13:39:20+5:302024-06-24T13:41:33+5:30
मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरु आहे. मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे, असे सांगत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे.
छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. मुस्लीम समाजातील काही घटकांना २५ वर्षांपूर्वी आरक्षण दिलेले आहे. मनोज जरांगेचा अभ्यास कमी आहे. उगीच माहीत काही नसतंय बोलायचं म्हणून उगी बोलायचं. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाबद्दल खुश करण्यासाठी बोलायचं, असे छगन भुजबळ म्हणाले.
इम्पीरिकल डेटाबद्दलही छगन भुजबळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, १९९१ पासून समता परिषदेची मागणी होती. २०१६ साली माहिती गोळा झाली. मात्र पुढे आकडेवारी जाहीर झालेली नाही. आमचे म्हणणे आहे की, सेन्सर्स कमिशनकडून ती माहिती गोळा केली पाहिजे. कारण त्यांच्याकडून जेव्हा माहिती गोळा होते, त्यात चुकीची माहिती कुणी दिली तर त्याला शिक्षा आहे. रखडलेल्या दशवर्ष जनगणनेत जात गणना करा, ही आमची मागणी असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
याचबरोबर, आमदारांच्या निधी वाटपाबाबत छगन भुजबळ म्हणाले, अजून कुणालाही ही काही मिळाले नाही. विकासकांसाठी पैसे मिळतात. उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. आचारसंहितेमुळे सर्व निर्णय पेंडिग आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याशिवाय, मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मला काहीच अपेक्षा नाही. खाते अपडेट वगैरे काही नाही. मला फक्त लोकांची काम करायची आहेत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
काय म्हणाले होते मनोज जरांगे-पाटील?
राज्यात काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्याही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. मुस्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद निघाली असेल, तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. तसेच, त्यांना आरक्षण कसे मिळत नाही, तेच मी बघतो, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.