छगन भुजबळ जेलमध्ये
By admin | Published: March 18, 2016 04:09 AM2016-03-18T04:09:11+5:302016-03-18T04:09:11+5:30
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांना सात दिवस आमच्या कोठडीत
- डिप्पी वांकाणी, मुंबई
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांना सात दिवस आमच्या कोठडीत ठेवण्याची परवानगी द्यावी, ही सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) विनंती न्या. पी.आर. भावके यांनी अमान्य केली. पुतण्या समीर आणि सर्व कंत्राटदार, विकासक आणि साक्षीदार यांच्यासमोर भुजबळ यांना बसवून त्यांच्या संस्थांना दिलेल्या देणग्या तसेच अन्य काही माहिती आम्ही मिळवू इच्छित आहोत, भुजबळ यांची प्रकृती बरी नसल्याने ते आम्हाला आधी करता आले नव्हते, असे ईडीने म्हटले होते. पण त्यांची विनंती अमान्य करण्यात आली.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर या प्रतिनिधीशी बोलताना भुजबळ यांनी आपणास नक्कीच खरा न्याय मिळेल, असा दावा केला. मात्र न्यायालयात त्यांनी एंडीच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी नाराजी व्यक्त करताना अधिकाऱ्यांनी वेळेवर माझा जबाब नोंदवून घेतला नाही, अशी तक्रारही केली.
भुजबळ यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही आता त्यांच्या मालकीचा मालेगावचा गिरणा साखर कारखान्याना ताब्यात घेणार आहोत. आर्थिक घोटाळ्यातील पैशातून तो कारखाना खरेदी केला असल्याचा ईडीचा दावा आहे. सत्र न्यायालयात कडक सुरक्षा व्यवस्थेत भुजबळ आणण्यात आले, तेव्हा ते अतिशय थकल्याचे आणि तणावात असल्याचे दिसत होते.
भुजबळांना सात दिवसांची ईडीची कोठडी मिळावी, अशी विनंती करताना अॅड. हितेन वेणेगावकर म्हणाले की, एमईटीचं सीए सुनील नाईक आणि अमित बिराजज यांच्यासमोर आम्ही भुजबळ यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भुजबळ यांनी स्वत: आजारी असल्याचे भासवले. त्यामुळे जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. तपासणीत खूपच वेळ गेला. मात्र नाईक आणि बिराज हे दोघे आपल्या आधीच्या जबानीवर ठाम राहिले. त्यापैकी बिराजने संचालकपद सोडण्याचे ठरवले, तेव्हा भुजबळ यांना त्याला धमकावले होते. आम्ही आज, गुरुवारी सकाळी आम्हाला समीरची कोठडी मिळाल्यानंतर समीर आणि भुजबळ यांना एकत्र बसवून काही माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न होता. पण तोपर्यंत भुजबळ यांना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्याची वेळ झाली. त्यामुळे आमची तपासणी पूर्ण झालेली नाही.
त्यावर २00 कोटी रुपयांच्या लाँडरिंगची माहिती नवी आहे की जुनी असे न्यायाधीशांनी विचारले, तेव्हा अॅड. वेणेगावकर यांनी ती माहिती जुनीच असल्याचे मान्य केले. मात्र २00 कोटींच्या व्यवहारात भुजबळ यांची तपासणी करायची आहे, असे ते म्हणाले.
मकोका लावा
भुजबळ यांचा हा संघटित गुन्हा असल्याने त्यांना मकोका लावावा, अशी विनंती अॅड. विनोद गंगवाल यांनी न्यायालयाला केली. त्यावर ३१ मार्च रोजी सुनावणी होईल.
१२ क्रमांकाची बरॅक
छगन भुजबळ यांना आर्थर रोडच्या कारागृहातील १२ क्रमांकाच्या बरॅकमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी काही कैद्यांना अन्यत्र हलवण्यात येईल. समीर भुजबळलाही तेथेच ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांना घरचे जेवण आणि औषधे देण्यात यावीत, यासाठी आपण अर्ज करणार असल्याची माहिती भुजबळ यांच्या वकिलांनी दिली.
आपची विनंती : आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा मेनन यांनी या वेळी न्यायालयाला विनंती केली की याच प्रकरणात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे या खटल्यात आपलेही म्हणणे ऐकून घेतले जावे. काही साक्षीदारांना धमक्या आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.